स्पीड नको; पण ब्रेकर आवरा...

स्पीड नको; पण ब्रेकर आवरा...

‘सावधान पुढे स्पीड ब्रेकर आहे’ असा इशारा देणारे फलक साताऱ्यातून नामशेष झालेत. दिवसेंदिवस स्पीड ब्रेकरची संख्या मात्र न्यायालयीन आदेशाचा भंग करत वाढते आहे. ‘सकाळ’ने स्पीड ब्रेकरच्या विषयावर प्रकाश टाकल्यानंतर वर्ष झाले पालिकेचे अभियंते अजून सर्वेक्षणच करत आहेत. हे सर्वेक्षण कधी पूर्ण होणार, त्यानंतर बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले त्रासदायक स्पीड ब्रेकर निघणार कधी, असा प्रश्‍न आहे. या स्पीड ब्रेकरमुळे वाहनचालकांना ‘स्पीड नको पण स्पीडब्रेकर आवरा...’ असे म्हणायची वेळ आली आहे. 

सातारा शहरात गेल्या वर्षभरात रस्ता डांबरीकरणाच्या कामात पालिकेने मनमानी करत स्पीड ब्रेकर उभारले. उताराच्या आणि अरुंद रस्त्यांवर स्थानिक रहिवाशांनी आपापल्या दारात स्पीड ब्रेकर टाकण्याची गळ घातली. काहींनी नगरसेवकांनाच फोन जोडून दिले. स्थानिकांच्या दबावापुढे ठेकेदाराच्या मुकादमाचाही नाईलाज झाला. हे करत असताना दोन स्पीड ब्रेकरमध्ये पुरेसे अंतरही राखता आले नाही. हे स्पीड ब्रेकर असलेल्या रस्त्यांवर वाहनचालकांना वाहनाचा किमान वेगही राखता येईना, इतकी वाईट परिस्थिती आहे. क्‍लच वापरूनच वाहन चालवावे लागते. ग्रामोद्धार प्रेसपासून आत जाणाऱ्या रस्त्यावर लोणार गल्लीमध्ये सुमारे २५० मीटर अंतराच्या रस्त्यात सात ब्रेकर आहेत. यातील काही ब्रेकर इतके उंच आहेत की त्यावरून वाहन चालवताना बऱ्याच वेळा वाहन बंद पडते. मंगळवार पेठेत ढोणे कॉलनी ते पत्रेवालाचाळ, शुक्रवार पेठेत अनंत इंग्लिश स्कूल कॉर्नर ते बदामी विहीर, सदरबझारमध्ये रिमांड होम, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल परिसर, मुथा चौक हा परिसर स्पीड ब्रेकरचे आगार झाला आहे.

या स्पीडब्रेकरमुळे अपघातांचे प्रमाण घटण्याऐवजी वाढले आहे. ‘सकाळ’ या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठांना स्पीड ब्रेकरचे सर्वेक्षण करायला सांगितले होते. वर्ष उलटले, म्हणे ‘अजून सर्वेक्षण बाकी आहे!’ त्यातही सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शहर वाहतूक शाखेला देण्यात येईल. 
 

लुटूपूटूच्या लढाईत पदाधिकारी गर्क
सर्वेक्षणालाच वर्ष लागत असेल अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे कार्यवाही व्हायला पालिकेच्या पुढील निवडणूकांच्या आचारसंहितेचा अडसर येऊ शकतो, असे मानायला पुरेसा वाव आहे. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक नाही. प्रशासन निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात गर्क आहे. नागरिकांना काय त्रास सहन करायला लागतो, त्याकडे लक्ष देण्याऐवजी पदाधिकारी आरोप- प्रत्यारोपांच्या लुटूपूटूच्या लढाईत गर्क आहेत. स्पीड ब्रेकरसारख्या छोट्या-छोट्या समस्यांच्या निवारणासाठी नागरिकांनी राजघराण्यांचे दरवाजे  वाजवायचे काय? असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com