अतिक्रमण निर्मूलन पथकावरच हल्ला

अतिक्रमण निर्मूलन पथकावरच हल्ला

कोल्हापूर - गंगावेस येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करणाऱ्या पथकावरच किशोर आयरेकर या वडा-पावच्या गाडीचालकाने हल्ला केला. या वेळी जेसीबीचालक शंकर गामा मराडे व मुकादम उमेश मोहिते यांना मारहाण करण्यात आली, तर कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली.

या प्रकारानंतर शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करत आयरेकरवर फौजदारी दाखल करावी, तसेच तातडीने त्याचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली. मात्र महापालिकेच्या काही पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला. 

महापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाने आजपासून पुन्हा अतिक्रमण मोहीम हाती घेतली. सकाळी साडेदहाला पापाची तिकटी येथून कारवाईला सुरवात झाली. दिसेल ते अतिक्रमण काढत पंधरा ते वीस मिनिटांत हे पथक गंगावेस येथे आले. तेथे आयरेकर यांचे बाबा वडा सेंटर आहे. या सेंटरवर कारवाई करताना आयरेकर यांनी विरोध केला. जेसीबीचालकाने जेसीबी शटरवर घालताच आयरेकरने संतप्त होत चालकावरच हल्ला केला. आयरेकर याने जेसीबीवर चढून चालक शंकर  मराडे यांना खाली खेचत त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. 

यावेळी मुकादम उमेश मोहिते यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही मारहाण करण्यात आली. तसेच कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अर्वाच्च शिवीगाळ केली.

कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांना सुनावले
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच मारहाण आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ झाल्यानंतरही त्या कर्मचाऱ्यांनाच माफी मागायला लावण्यात आली. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. अतिक्रमणाचा मुद्दा नगरसेवकच सभागृहात आणि वॉर्ड मिटिंगमध्ये काढतात आणि कारवाई करायला आले की मध्यस्थी करतात. अतिक्रमण असूनही काही अतिक्रमणधारकांची ही दादागिरी कर्मचाऱ्यांनी किती काळ सहन करायची? कर्मचाऱ्यांनीच मार का खायचा, असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना चांगलेच सुनावले.

अतिक्रमण काढायची ही पद्धत आहे का?
अतिक्रमण काढायची ही पद्धत आहे का? अशी विचारणा करत आयरेकरने अतिक्रमण काढणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरवात केली. माझे शटर अतिक्रमणात येत नाही. तेच तुम्ही काढले आहे, असे म्हणत माझे झालेले नुकसान भरून द्या, असे म्हणत त्याने कनिष्ठ अभियंता कांबळे यांना शिवीगाळ केली.

तरीही अतिक्रमण काढून घेण्याची मुभा 
एवढा प्रकार होऊनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आयरेकर याला अतिक्रमण काढून घेण्याची मुभा दिली. उद्यापर्यंत अतिक्रमण काढून घेतो, नुकसान करू नका. माझे नुकसान झाले आहे, असे म्हणत आयरेकर याने अतिक्रमण काढून घेण्याची मुदत मागितली. त्याला एक दिवसाची मुदत देण्यात आली.

कर्मचारी संतप्त
आयरेकर याने मारहाण केल्यानंतर कर्मचारीही संतप्त झाले. आयरेकरचे अतिक्रमण आताच्या आता आम्ही काढणार आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करणार, असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. काही काळ त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले. या वेळी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, नाना आयरेकर यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.  सहायक आयुक्त, सचिन खाडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले, आस्थापन अधिकारी विजय वणकुद्रे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com