एसटीत कर्मचारी... प्रवासी रस्त्यावर!

सातारा - मतदान केंद्रावर यंत्रे व कर्मचारी पोचविण्यासाठी सोमवारी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात एसटी बस मागवल्या होत्या.
सातारा - मतदान केंद्रावर यंत्रे व कर्मचारी पोचविण्यासाठी सोमवारी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात एसटी बस मागवल्या होत्या.

निवडणूक यंत्रणेच्या वापरामुळे वाहतूक कोलमडली; वडापची झाली चांदी
सातारा - जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, इतर साहित्य व कर्मचारी पोचविण्याच्या कामावर आज जिल्ह्यातील तब्बल ३७८ एसटी सोडण्यात आल्या. निवडणूक यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात बस लागल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक कोलमडून गेलेली दिसली. एसटी नसल्याने वडापची चांगलीच चांदी झाली.

जिल्ह्यात उद्या (ता. २१) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी जिल्ह्यात दोन हजार ५८४ मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. त्यापैकी अनेक केंद्रे अगदी दुर्गम भागात आहेत. तेथपर्यंत मतदानाचे साहित्य व कर्मचारी पोचविण्यासाठी शासकीय वाहने नेहमीच अपुरी पडतात. त्यामुळे खासगी तसेच एसटीची मदत घ्यावी लागते. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील ११ आगारांच्या ३७८ गाड्या निवडणूक यंत्रणेला दिल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली. एसटीच्या आज सकाळी निवडणूक प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या गाड्या सायंकाळी साहित्य पोचवून पुन्हा प्रवासी सेवेत येणार आहेत. आज सकाळीच या गाड्या मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी शासकीय गोदाम परिसरात जाऊन थांबवल्या होत्या. बहुतांश आगारांतून ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या गाड्याच प्राधान्याने या सेवेसाठी दिल्या होत्या. आज सकाळपासूनच ग्रामीण भागात एसटी गेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेक गावांचे आज आठवडा बाजारही होते.

त्यासाठी तसेच इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना ‘वडाप’चा आसरा घ्यावा लागला. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात आज वडापचा धंदा तेजीत दिसला. सहा आसनी रिक्षांत प्रवासी अक्षरशः कोंबले जात होते. त्यामुळे आज वडापची चांदी झाली. एसटीबरोबरच खासगी स्कूल बसही आज निवडणुकीच्या कामावर लावल्या होत्या. 

एसटीची सेवा गुरुवारीही कोलमडण्याची शक्यता
जिल्ह्यात गुरुवारी (ता. २३) प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर मतदान यंत्रे व इतर साहित्य तसेच कर्मचारी आणण्यासाठीही एसटी बस घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी दुपारपासून ग्रामीण भागातील एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com