एसटी कामगार वेतनकरार 30 एप्रिलपर्यंत - दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन करारासंदर्भातील वाटाघाटीची प्रक्रिया लवकर संपवून वेतनवाढीचा निर्णय येत्या 30 एप्रिलपर्यंत घ्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह परिवहन आयुक्त, संचालक, कामगार आयुक्त, वित्त सल्लागार अधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या वेळी मंत्री रावते यांनी हे निर्देश दिले.

महाराष्ट्र एसटी मान्यता कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन लवकरच होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातही मान्यता प्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. तेथे वेतन करारासंदर्भात चर्चा झाली आहे त्या अनुषंगाने वेतन करारासंदर्भात श्री. रावते यांनी दिलेल्या निर्देशाला महत्त्व आले आहे. एसटी महामंडळाच्या उच्च अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कामगार वेतन करारासंर्दभात एसटी प्रशासन व मान्यता प्राप्त संघटना यांच्यात अनेकदा चर्चा झाल्या. यात वेतनवाढीचा मूळ विषय सोडून अन्य विषयात संघटनेने चर्चेत जास्त रस घेतला. प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाची मागणी अयोग्य असल्याची भूमिका मांडली. तरीही संघटना सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर अडून बसली आहे. कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या 12 हजार 514 कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर संघटनेने अनास्था दाखवित असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत फेरविचार करण्याची संधी संघटनेला प्रशासनाने दिली होती. मात्र संघटनेने प्रतिसाद दिला नाही. आता यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.