घटनेच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहा  - प्रा. जोगेंद्र कवाडे

घटनेच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहा  - प्रा. जोगेंद्र कवाडे

कोल्हापूर - ""ज्या भारतीय राज्यघटनेचे जगभरातील विद्वानांनी कौतुक केले, तीच राज्यघटना बदलण्याचे कट-कारस्थान भाजप सरकार करीत आहे. अशा सरकारचे हात बळकट करणाऱ्यांची राजकीय निष्ठा व नीतिमत्ता तपासली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन घटनाविरोधी कारस्थान करणाऱ्यांपासून सावध राहा. येणाऱ्या आव्हानांना एकजुटीने परतविण्यासाठी सज्ज व्हा,'' असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीतर्फे घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. येथील दसरा चौकात "चळवळींची दिशा व देशातील राजकारण' या विषयावर व्याख्यान झाले. तत्पूर्वी शहरातून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. 

प्रा. कवाडे म्हणाले, ""कोल्हापूर नगरीत सर्व जण एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात ही बाब समाधानाची आहे. अशाच पद्धतीने आपणा सर्वांची वाटचाल भविष्यात एकजुटीने झाली पाहिजे. इतिहास कोणाला चिडविण्यासाठी नसतो. कोणाचा पाणउतारा करण्यासाठी अथवा कोण छोटे कोण मोठे हे ठरविण्यासाठी नसतो. पण इतिहासाला छेद देण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून देशातील स्थिती चिंतेची बनवली जात आहे. जी राज्यघटना संपूर्ण देशवासीयांच्या कल्याणासाठी बनविली आहे त्याच घटनेवर घाला घालण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे. हे सरकार आरएसएसचे आहे. त्यांच्याकडून असे प्रयत्न होत आहेत. अशा सरकारसोबत आपल्यातील काही लोक जातात. शत्रूसोबत जाऊन शत्रूचे हात बळकट करण्याचे काम त्यांनी केले. आता हे थांबले पाहिजे.'' 

ते म्हणाले, ""अत्याचार घडतात, मिरवणुकांवर हल्ले होतात, शेतकरी आत्महत्या करतात, अशा घटना थांबलेल्या नाहीत. जातीवादी शक्तीचे हे कारस्थान आहे. अशा कारस्थानींबरोबर आपण हातमिळवणी करणे ही बाब चुकीची आहे. अशा स्थितीत आपण सावध होऊन एकजुटीने घटनेच्या विरोधातील शत्रूने तयार केलेली आव्हाने परतविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी सर्व डॉ. आंबेडकरी विचारशक्तीची एकजुटीची वाटचालच महत्त्वाची आहे.'' 

या वेळी मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष सखाराम कामत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, ऍड. पंडितराव सडोलीकर, गवई गटाचे विश्‍वासराव देशमुख, बबन सावंत, पीपल्स रिपब्लिकनचे दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, ब्लॅक पॅंथरचे सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, भाऊसाहेब काळे, सुशील कोल्हटकर, रूपा वायदंडे, लता कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

शहरातून शोभायात्रा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीतर्फे भीम महोत्सवाअंतर्गत शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. दसरा चौकातून आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्‌घाटन करण्यात आले. समता व बंधुतेची शिकवण देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोचविण्यासाठी, समाजकल्याणासाठी सर्वच घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भाऊसिंगजी रोड, गंगाराम कांबळे पुतळ्यास हार अर्पण करून टाउन हॉलमार्गे दसरा चौकात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com