स्थानिक नेतेच स्टार प्रचारक 

स्थानिक नेतेच स्टार प्रचारक 

कोल्हापूर -  महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनाच स्टार प्रचारकांची भूमिका बजवावी लागत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे, मात्र सर्वच नेते स्थानिक पातळीवरील निवडणुकीत गुंतले असल्यामुळे त्यांच्या तारखा मिळविण्यासाठी आता जिल्ह्यातील नेत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

एक-दोन दिवस अगोदर नेत्यांचे दौर निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ठरविलेल्या धोरणानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेवटच्या टप्प्यात हातकणंगलेत सभा होण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महापालिका महत्त्वाची असल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे सर्व नेते या निवडणुकीत व्यस्त आहेत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने ते त्यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचेच जिल्हा नेत्यांना प्रमुख कार्यकर्त्यांची आणि स्टार प्रचारकाचीही भूमिका पार पाडावी लागणार आहे. 

दरम्यान, यातूनही गुलाबराव पाटील, नितीन बानुगडे-पाटील, अमोल कोल्हे, नीलमताई गोऱ्हे यांच्या प्रचारसभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेसारख्या पक्षाने चांगलीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील दहापैकी निम्म्यापेक्षा अधिक सहा आमदार त्यांचे निवडून आले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा भगवा होईल, अशी पेक्षा होती; पण तसे घडताना दिसत नाही. यावेळी मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक एकाचवेळी लागली आहे. शिवसेनेला मुंबई महापालिका महत्त्वाची, त्यातच अनेक वर्षांपासूनची भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. 

राज्यभर शिवसेनेने संपर्कप्रमुख किंवा अन्य जे पदाधिकारी नियुक्‍त केले आहेत. त्यातील बहुतांशी पदाधिकारी मुंबईचे आहेत. त्यांचेही कार्यकर्ते या निवडणुकीत उतरले असल्यामुळे त्यांचीही अडचण झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबई सोडून एक दिवसही बाहेर जाणे शक्‍य नाही. कोल्हापूरचे संपर्कप्रमुख दुधवडकर यांच्या पत्नीच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्यामुळे त्यांच्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनाच स्टार प्रचारकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. 

प्रचाराच्या नियोजनाच्या बैठका सुरू असून, त्यामध्ये गुलाबरावर पाटील, नितीन बानुगडे-पाटील, शिवराम शेटे, अमोल कोल्हे, नीलमताई गोऱ्हे यांच्या प्रचारसभा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र ते यावेळी कितपत उपलब्ध होऊ शकतील याबाबत कार्यकर्त्यांच्या मनामध्येच शंका आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसही सभांचे नियोजन करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंडे यांच्याबरोबरच दिलीप सोपल, माजी मंत्री जयंत पाटील, प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. 

भाजप घेणार मुख्यमंत्र्यांची सभा 
शिवसेनेप्रमाणेच भारतीय जनता पक्षानेही मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे कोल्हापुरात 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यांना असणारी मागणी आणि वेळ यांचे गणित विसकटू लागले आहे. याशिवाय सहकार मंत्री सुभाष देशमुख, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या सभा होणार आहे. 

नारायण राणेंच्या सभेसाठी प्रयत्न 
कॉंग्रेसने प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांवर त्या त्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली आहे. सर्वत्र भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेलाच टार्गेट केले असल्यामुळे आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात सभा घेण्यास नेत्यांना अडचणी आहेत. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते येण्याची शक्‍यता कमी आहे, मात्र जिल्ह्यातील नेत्यांकडून प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व सहकारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रत्येक गटात सभा ठेवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com