कोल्हापुरात राज्य बॅंकेची शाखा

निवास चौगले : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

दृष्टिक्षेपात बॅंक
- राज्यभरात एकूण 48 शाखा
- कोल्हापूरसह सात जिल्ह्यांत शाखा
- जिल्ह्यातील चार कारखाने कर्जदार
- शाखेमुळे नवे कर्जदार मिळतील

रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट : कर्ज सुविधा होणार अधिक सुलभ

कोल्हापूर, ता. 27 :  कोल्हापुरात राज्य सहकारी बॅंकेची शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बॅंकेने मान्यता दिली आहे. हा निर्णय म्हणजे कोल्हापूरकरांसाठी रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेटच असून, साखर कारखाने, सूत गिरण्या व मोठ्या उद्योगांना कर्ज मिळण्याची प्रक्रियाही सुलभ होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने विविध कारणांसाठी दोन वर्षांपूर्वी राज्य बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्‍तीची कारवाई केली होती. त्या वेळी बॅंकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. ही कारवाई म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. या कारवाईवेळीच रिझर्व्ह बॅंकेने राज्य बॅंकेला 11 निर्बंध घातले होते.

अध्यक्षांचे कर्ज मंजुरी अधिकार रद्द, कर्ज समिती सदस्य संख्या 15 पर्यंत सीमित ठेवणे, निगेटीव्ह नेटवर्थमध्ये असलेल्या संस्थांना कर्जपुरवठा न करणे आदी निर्बंधांचा समावेश होता. 20 ऑक्‍टोबर 2016 च्या आदेशाने रिझर्व्ह बॅंकेने हे सर्व निर्बंध रद्द करतानाच बॅंकेला सात जिल्ह्यात नव्या शाखा उघडण्यास परवानगी दिली आहे.

राज्य बॅंकेच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अकोला व अमरावती या शहरापुरत्या मर्यादित राहिलेल्या बॅंकिंग सेवा राज्यातील अन्य शहरातील ग्राहक व संस्थांना मिळाव्यात, या उद्देशाने रिझर्व्ह बॅंकेने कोल्हापूरसह पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, बीड व धुळे या सात जिल्ह्यांत शाखा उघडण्यास राज्य बॅंकेला परवानगी दिली आहे. या नव्या शाखांमुळे राज्य बॅंकेच्या एकूण शाखांची किंमत 48 होणार आहे.
कोल्हापुरात राज्य बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय आहे, पण तेथून बॅंकेच्या कर्जदार संस्थांवर देखरेखीशिवाय काहीही कामकाज होत नाही.

जिल्ह्यातील "शाहू-कागल', "कुंभी', "मंडलिक-हमीदवाडा' व "डी. वाय-गगनाबवडा' हे चार कारखाने राज्य बॅंकेचे कर्जदार आहेत. या कारखान्यांना राज्य बॅंक कर्ज देत असली तरी प्रक्रिया मात्र जिल्हा बॅंकेकडूनच राबवावी लागते. राज्य बॅंकेची शाखा सुरू झाल्यानंतर या कारखान्यांची प्रक्रिया तर सुरळीत होईलच, पण नवे कर्जदार कारखाने व इतर संस्थांही राज्य बॅंकेला मिळतील, त्यातून बॅंकेचा व्यवहार वाढण्यास मदत होणार आहे.

 

Web Title: State Bank branches in Kolhapur