महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही? - पृथ्वीराज चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

कऱ्हाड - उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली जात असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती का दिली जात नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.

श्री. चव्हाण म्हणाले, 'राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र, मुख्यमंत्री ते शक्‍य नाही, असे जाहीरपणे सांगत होते. त्यामुळेच आम्ही आक्रमक भूमिका घेतली.

आम्हाला राष्ट्रवादीची सोबत आहे आणि सत्ताधारी शिवसेनाही आमच्यासोबत आहे. गेल्या आठवड्यात भाजपचेही आमदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असा सभागृहात आग्रह धरू लागल्याने मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावे लागले. राज्य सरकार सिंचनावर किती खर्च केला हे सांगत आहे, मात्र आर्थिक पाहणी अहवालात राज्याची बिकट आर्थिक अवस्था असल्याचा उल्लेख आहे.''

'गोव्यात सत्तेचा गैरवापर करत कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचे मत व्यक्त करत ते म्हणाले, 'उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपद भाजपची दिशा स्पष्ट करत आहे. जातीय धृवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील अल्पसंख्याक समाज भयभीत आहे.''

ते म्हणाले, 'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवर प्रसंगी शिवसेनेशी युती करावी लागली, तरी करावी असा एक मतप्रवाह कॉंग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. मी स्वत: कॉंग्रेसमधील आमदारांशी याबाबत चर्चा केली आहे. शिवसेनेला मदत ही केवळ स्थानिक पातळीवरच केली जाणार आहे.'