वादळी वाऱ्यासह कोपरगावमध्ये पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

कोपरगाव - शहर व तालुक्‍यात अनेक गावांत शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली; बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.

कोपरगाव - शहर व तालुक्‍यात अनेक गावांत शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली; बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.
या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साठले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेला पावसाचा तडाखा बसला. मैदानावरील सर्व फलक उडून गेले.

कोपरगावकर तीन-चार दिवसांपासून उकाड्याने त्रस्त होते. दुपारी पावणेतीनच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले व विजांचा कडकडाट होऊ लागला. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणचे तात्पुरते निवारे पडले. जनावरांसाठी बांधलेली छपरे अस्ताव्यस्त झाली. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. उन्हाळी वाळवण करणाऱ्या महिलांची मात्र धावपळ उडाली. पाऊस थांबल्यानंतर मात्र वातावरणातील उकाडा वाढला. त्यातच वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले.

दरम्यान, अकोले तालुक्‍यातील गावांमध्ये आज सायंकाळी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. साधारण दोन तास पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र शेतात काढलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भंडारदरा परिसरातही पावसाळी वातावरण होते. काही ठिकाणी हलक्‍या सरी झाल्या.