स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी, गुजबेरीची गोडी...

स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी, गुजबेरीची गोडी...

पाचगणीच्या वातावरणात विविध जातींना बहर; आंबोळकी बाजारपेठेत दाखल 
पाचगणी - नवनवीन जाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रॉबेरीच्या फळाने या भागात आपले साम्राज्य निर्माण केले असले तरी, थंड हवेची खासियत असलेल्या या फळाच्या जोडीला रासबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटोनेही हजेरी लावली आहे. तर काही वर्षांपूर्वी ‘एन्ट्री’ केलेल्या रेड राजबेरी ने ‘एक्‍झिट’ घेतली आहे. रेड कॅबेज, ब्रोकोलीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे.

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान झालेल्या पाचगणी, महाबळेश्वर म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा खजिना..! मलबेरी, राजबेरी, गुजबेरी, तोरणे, आंबोळकी, जांभूळ म्हणजे या भागातील डोंगरीमेवा. जुन्या जातीचा ऑस्ट्रिया, निग्रो व बंगलोर जातीच्या स्ट्रॉबेरीला बगल देऊन कॅलिफोर्निया स्ट्रॉबेरीने या भागात साम्राज्य प्रस्थापित केले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्रास शेतकऱ्यांनी या पिकाकडे मोर्चा वळविला आहे. यावर्षी आकाराने मोठे, चविष्ट, रुचकर असलेले हे फळ बाजारपेठेत मुबलक प्रमाणात दाखल झाले असून त्याच्या जोडीला ब्लॅक राजबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटो दृष्टीस पडत आहे. स्थानिक बाजारपेठेत स्ट्रॉबेरी ८० रुपये, राजबेरी ३००, गुजबेरी ३००, चेरी टोमॅटो ८० रुपये किलोने मिळत आहे. तर, इतिहासजमा होत असलेल्या मलबेरीने अल्पशा प्रमाणात हजेरी लावली असून प्रति किलोस हजार रुपयांचा दर मिळविला आहे. 

इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असलेल्या ब्लॅक राजबेरीचे उत्पन्न यावर्षी समाधानकारक असल्याचे अवकाळी येथील शेतकरी प्रवीण डोईफोडे यांनी सांगितले. राजबेरीचे फळ अति नाशवंत असल्याने तिचा फ्रुट म्हणून कोणीही स्वीकार केलेला नसल्याचे सांगताना पांगारीचे शेतकरी महेंद्र पांगारे यांनी सांगितले, की ‘मलबेरी घाऊक बाजारपेठेत निर्यात होऊ शकली नाही.

पण, शेतात जाऊन त्याचा स्वाद घेणे अनेकजण पसंद करतात. दरम्यान, करवंदे, तोरणं, जांभूळ या अन्य रानमेव्याची प्रतीक्षा होत असताना आंबोळकी मात्र बाजारपेठेत दाखल झाली आहे. त्याशिवाय चेरी टोमॅटोही मुबलक प्रमाणात दृष्टीस पडत असून मुळच्या युरोपच्या रेड कॅबेज व ब्रोकोली यांनीही चांगले ठाण मांडले आहे. पण, त्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोचला आहे.

रेड राजबेरीची एक्‍झिट 
गेल्या काही वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरी कंट्री म्हणून परिचित असलेल्या परिसरात ‘रेड राजबेरी’ ने ‘एन्ट्री’ केली. पण, जे काही उत्पन्न हाती लागत होते, ते अल्पशा प्रमाणात होते. त्याचे दरही आकाशाला गवसणी घालणारे असल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेऐवजी शहरी भागाचा मार्ग स्वीकारला. पण, त्याचा वाहतूक खर्चही अधिक होता. त्याचबरोबर फळही नाशवंत असल्याने रेड राजबेरीने या भागात काही तग धरला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com