‘कर्नाटक परिवहन’चा आडमुठेपणा सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

निपाणी बसस्थानकात रंकाळा बसचा फलाट बदलला; प्रवाशांचे हाल

कोल्हापूर - कागल आगाराने निपाणी-रंकाळा मार्गावर बससेवा सुरू केल्यापासून निपाणी आगाराचा सावत्रपणा सुरूच आहे. प्रारंभाच्या दिवशीच बससेवा बंद पाडण्याचा घाट निपाणीकरांनी हाणून पाडला. त्यानंतर अरेरावी करून फलाटावरून बसला अवघ्या पाच मिनिटांत जाण्यास भाग 
पाडण्यात आले. 

निपाणी बसस्थानकात रंकाळा बसचा फलाट बदलला; प्रवाशांचे हाल

कोल्हापूर - कागल आगाराने निपाणी-रंकाळा मार्गावर बससेवा सुरू केल्यापासून निपाणी आगाराचा सावत्रपणा सुरूच आहे. प्रारंभाच्या दिवशीच बससेवा बंद पाडण्याचा घाट निपाणीकरांनी हाणून पाडला. त्यानंतर अरेरावी करून फलाटावरून बसला अवघ्या पाच मिनिटांत जाण्यास भाग 
पाडण्यात आले. 

एवढ्यावरच न थांबता जुजबी कारणे देत चार दिवसांपासून मार्गाचा फलाटच बदलून ६ क्रमांकाच्या फलाटवर रंकाळा बस लावण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे आता बस्स, खूप झाली ही सावत्रपणाची वागणूक, अशा संतप्त प्रतिक्रिया वाहक, चालक व प्रवाशांतून व्यक्त होत आहेत.

निपाणी-रंकाळा मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने त्या बसला गर्दी साहजिकच आहे. त्याचा पोटशूळ उठलेल्या निपाणी आगार प्रशासनाने 
रंकाळा मार्गावरील वाहक-चालकांना नानाविध प्रकारे त्रास देण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्र बसला मिळत असलेले उत्पन्न पाहून आता निपाणी-कागल मार्गावर निपाणी आगारानेही बसफेऱ्या वाढविल्या आहेत. या बसगाड्या मात्र नेहमीच्या फलाटवर लागतात. पण केवळ निपाणी-रंकाळा बसचा फलाट बदलून आडमुठेपणा दाखवला आहे. त्यामुळे प्रवाशांची फरफट होत असून संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात कर्नाटक बसची अडवणूक झाल्यास काय?
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या विविध आगांरातून महाराष्ट्रात कागल, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पंढरपूर, तुळजापूर, इचलकरंजी, सांगली, महाबळेश्‍वर, जोतीबा यासह विविध ठिकाणी रोज २२० फेऱ्या होतात. त्यांची महाराष्ट्रात अडवणूक केल्यास कर्नाटक परिवहन महामंडळाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे निपाणी आगाराने रंकाळासह अन्य मार्गावरील बसगाड्यांना आडकाठी न आणण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

अचानक फलाट बदलल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यात महिला व वृद्धांना होणारा त्रास अधिक आहे. त्यामुळे निपाणी आगाराने महाराष्ट्र परिवहन महामंडळाला सहकार्य करण्याची गरज आहे.
-प्रकाश शिंदे, कागल आगारप्रमुख

लोकल व एक्‍सप्रेस बसचे फलाट वेगळे केले आहेत. त्यामुळे निपाणी-रंकाळा बस अन्य फलाटवर लावण्यास सांगण्यात आले आहे.
-एस. संदीपकुमार, निपाणी आगारप्रमुख

निपाणी आगारात रंकाळा बस अन्यत्र लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना हाक देऊन बोलवून घ्यावे लागत आहे. फलाट बदलल्याने उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
-समीर मुजावर,  वाहक-रंकाळा बस

Web Title: stubbornness by karnataka transport