अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कृषी विभाग; कीटकनाशके, सूक्ष्म सिंचन साधनासाठी निर्णय

कृषी विभाग; कीटकनाशके, सूक्ष्म सिंचन साधनासाठी निर्णय
सोलापूर - राज्य सरकारने लाभाच्या वस्तूंचे अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता कृषी विभागाने कीटकनाशके, सूक्ष्म सिंचन व सिंचनासाठी लागणाऱ्या साधनाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी बॅंक खात्याला संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक जोडलेला असणे आवश्‍यक आहे.

कृषी विभागामार्फत यापूर्वी कीटकनाशक, सूक्ष्म सिंचन व सिंचनाच्या साधनांचा पुरवठा वस्तुरूपात केला जात होता. मात्र, शासनाने पाच डिसेंबरला घेतलेल्या निर्णयामुळे कृषी विभागाच्या या योजनांचाही त्यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कीटकनाशकासाठी किती पैसे लागतात तेवढी रक्कम आता थेट संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कीटकनाशक, सूक्ष्म सिंचन किंवा सिंचनासाठी लागणाऱ्या वस्तू शेतकऱ्यांनी थेट बाजारातून खरेदी करायच्या आहेत. वस्तू खरेदी करताना तो दुकानदार अधिकृत आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांनी करायची आहे. कृषी विभागाने निर्धारित केलेल्या दरामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर 15 दिवसांमध्ये त्यासाठीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणे संबंधित अधिकाऱ्यांना सेवा हमी कायद्याच्या अनुषंगाने बंधनकारक करण्यात आले आहे. वस्तू खरेदी करताना कॅशलेस पद्धतीने खरेदी करण्यावर भर द्यायचा आहे. दुकानदाराला रोख रक्कम न देता डिमांड ड्राफ्ट किंवा धनादेशाद्वारे ती रक्कम द्यायची आहे.

अंमलबजावणी सुरू
सरकारने याबाबतचा अध्यादेश जरी आज काढला असला तरी याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया सोपी की अवघड हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.