निष्पक्ष अधिकाऱ्यानेच केला खाकीचा पर्दाफाश

सुधाकर काशीद
शनिवार, 22 एप्रिल 2017

चोरही त्याच्या चोरीच्या 'कमाईवर' किती ठाम असू शकतो, याचे हे एक विचित्र व संतापजनक उदाहरण या निमित्ताने पुढे आले आहे. या शिवाय वारणेत एवढी मोठी रक्कम कशी आली, एका रिकाम्या फ्लॅटवर ती का व कोणी ठेवली, हा अनेकांच्या उत्सुकतेचा मुद्दा.

कोल्हापूर : वारणानगर येथील चोरीच्या प्रकरणातून काही पोलिसांचे काळे रूप जगासमोर आले असले तरीही सुहेल शर्मा यांच्यासारख्या एका निष्पक्ष पोलिस अधिकाऱ्यानेच खाकी वर्दीतील काळ्या वृत्तीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसच संशयित गुन्हेगार व तपासही पोलिसांकडे असल्यामुळे खाकी वर्दीला वाचवणे पोलिसांना सहज शक्‍य होते. पण येथे कर्तव्यदक्ष पोलिसांनीच काळ्या वृत्तीच्या पोलिसांची लक्तरे वेशीवर आणली आहेत. या प्रकरणात मैनुद्दिन मुल्ला हा मुख्य चोर. त्याने एकदा चोरी केली; पण या चोराला बरोबर घेऊन पोलिसांनीच त्याच ठिकाणी त्यानंतर दोनदा चोरी केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. 

वरवर हे प्रकरण जरूर पोलिसांवर शेकले आहे. पण या प्रकरणातला मुख्य संशयित मैनुद्दिन अद्याप फरार आहे. केवळ फरार इथंपर्यंत ठीक आहे. पण त्यानेही चक्क पोलिसांनी माझ्याकडून चोरीची रक्कम जप्त केली व प्रत्यक्षात पंचनाम्यात कमी दाखवली, अशा आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

चोरही त्याच्या चोरीच्या 'कमाईवर' किती ठाम असू शकतो, याचे हे एक विचित्र व संतापजनक उदाहरण या निमित्ताने पुढे आले आहे. या शिवाय वारणेत एवढी मोठी रक्कम कशी आली, एका रिकाम्या फ्लॅटवर ती का व कोणी ठेवली, हा अनेकांच्या उत्सुकतेचा मुद्दा. पण पहिल्या टप्प्यात झालेल्या चौकशीत तरी बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत व वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांचा मुलगा आशुतोष यांच्या भोवतीच ही रक्कम फिरत राहिली आहे. अर्थात आता सीआयडी चौकशी होणार आहे. त्यात आणखी काही दुवे मिळण्याची शक्‍यता आहे. 

आतापर्यंत ज्या चौकशीतून पोलिस निरीक्षक घनवट, सहायक निरीक्षक चंदनशिवे व अन्य सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांच्या चौकशीचे काम सुहेल शर्मा यांनी केले आहे. वारणेतील चोरी 8 मार्च 2016 ला झाली. मैनुद्दिन मुल्ला व त्याच्या साथीदाराने ही चोरी केली. मैनुद्दिन हा संशयित चोर, पण अनेकांच्या वाहनाचा खासगी ड्रायव्हर. ड्रायव्हर म्हणून काम करताना 'नजर ठेवायची व त्याची टीप इतर सहकाऱ्यांना द्यायची ही त्याची पद्धत. त्याच पद्धतीने एखाद्या ड्रायव्हरने मैनुद्दिनला वारणेतील पैशाची टीप दिली व चोरी झाली. 

ही चोरी 8 मार्चला झाली असली तरी 11 मार्चला मैनुद्दिन सांगली पोलिसांना सापडला व तपासासाठी त्याला वारणेत तीन वेळा आणले. एकदा अधिकृतपणे आणला व दोन वेळा त्याला घेऊन आलेल्या पोलिसांनीच उरलेल्या रकमेवर डल्ला मारला, असे आरोपाचे स्वरूप आहे. अर्थात हे आरोप ठेवताना खूप खोलवर चौकशी झाली. चौकशीचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी दिले. सुहेल शर्मा यांनी उपलब्ध माहिती, त्या माहितीची उलटसुलट खातरजमा, चोरीच्या पैशातून घेतलेली मालमत्ता याची माहिती संकलित केली व त्यामुळेच डल्ला मारणाऱ्या पोलिसांची काळी कृत्ये बाहेर आली. या प्रकरणाची चौकशी म्हणजे पोलिस खात्याची अब्रू पोलिसांकडूनच वेशीवर टांकण्याचा प्रकार होता. मात्र पोलिस दलात असलेल्या म्हणजे आता सापडलेल्या आणि अजूनही न सापडता प्रत्येक प्रकरणात डल्ला मारणाऱ्या इतर पोलिसांना अद्दल घडवण्यासाठी हे केले गेले.

आता या साऱ्या प्रकरणाचा पुन्हा तपास होणार आहे. स्वतंत्रपणे सीआयडी चौकशी होणार आहे. पण डायरीला केस दाखल झाली की त्याकडे 'कमाई' म्हणून बघणाऱ्या पोलिसातील प्रवृत्तीला यातून नक्कीच झटका बसणार आहे. 

मैनुद्दिनच खरा साक्षीदार 
मैनुद्दिन मुल्ला फरार आहे. अर्थात चोरी 10 रुपयाची असो किंवा 10 कोटींची, त्यातला मुद्देमाल मिळाला, तपास पूर्ण झाला की आरोपीला जामीन देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मैनुद्दिन सुटला; पण पुढच्या या सगळ्या प्रकरणाचा तोच खरा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.