सुमित्राराजे उद्यान कात टाकतंय

sumitraraje udyan satara
sumitraraje udyan satara

सातारा - पत्रा उचकटलेल्या घसरगुंड्या, साखळ्या तुटलेले झोपाळे, गुडगाभर वाढलेले गाजरगवत, सुकलेली झाडे... असे काहीसे सुमित्राराजे उद्यानात नेहमी दिसणारे चित्र हळूहळू पालटू लागले आहे. नवीन फुलझाडे व शोभिवंत झाडे, बसण्यासाठी लॉन, पाहावे तिकडे हिरवळ असे अचंबित करणारे दृष्य पाहायला मिळत आहेत. हो सदरबझारमधील हे उद्यान कात टाकत आहे. पावसाळ्यानंतर परिपूर्ण असे उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. 

सदरबझामध्ये सुमारे तीन एकर क्षेत्रामध्ये हे विस्तीर्ण उद्यान आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्याची दुर्दशा झाली. शहरातील बगिचांचे ठेके मनोमिलनात वाटले गेले. त्यात याही उद्यानाचा ठेका एका नगरसेविकेच्या पतीने पदरात पाडून घेतला. मात्र, संबंधिताला त्याठिकाणी काहीही करता आले नाही. खेळणी तुटलेली, गाजरगवत वाढलेले, झाड पाण्याअभावी सुकून गेलेली... अशा दुर्लक्षित स्थितीत हे उद्यान दीर्घकाळ पडून आहे. 

सुमित्राराजे उद्यानाला ऊर्जितावस्था देण्यासाठी नगरसेवक निशांत पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेमधून 63 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून या उद्यानात अधिक उंचीची झाडे लावण्यात आली आहेत. उद्यानातील 70 टक्के झाडे आठ ते दहा फूट उंचीची आहेत. शोभिवंत व फुलझाडेही लावण्यात आली आहेत. उद्यानातील विहिरीचे पाणीही ठिबक पद्धतीने झाडांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी कमी पडू नये म्हणून 

उद्यानालागतचा ओढा तीन ठिकाणी बांध घालून अडवण्यात आला. त्याचे पाणी या झाडांना देण्यात येते. उद्यानात तीन प्लॉटमध्ये लॉन लावण्यात आले आहे. 

उद्यानातील कामांविषयी बोलताना नगरसेवक श्री. पाटील म्हणाले, ""पालिकेच्या फंडातून 20 लाख रुपये मंजूर असून, त्यातून पेव्हरचा वॉकिंग ट्रॅक, नागरिकांना बसण्यासाठी बाकडी, तसेच अंतर्गत विद्युतीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. उद्यानातील विहिरीवरच कारंजा बसविण्याचे नियोजन आहे. खेळण्यांचीही दुरुस्ती करण्यात येईल.'' 

"सुमित्राराजे स्मृती उद्यानातील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून, प्रशासनाच्या सहकार्यामुळे सुशोभीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. ओपन जीम सुरू करण्याचेही नियोजन आहे. कामाचा वेग कायम राहिल्यास सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये उद्यान नागरिकांसाठी खुले होईल.'' 
निशांत पाटील, नगरसेवक, पक्षप्रतोद, सातारा विकास आघाडी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com