‘सुंदरा गार्डन’चा धनादेश नाही वटला

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

सातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी चोरीप्रकरणी कारवाई केलेल्या विसावा नाक्‍यावरील ‘सुंदरा गार्डन’चा धनादेश न वटता परत आला आहे.

प्रापंचिक अडचणीमुळे बिल भरू न शकलेल्या सामान्य ग्राहकाच्या पाच, दहा हजार रुपयांसाठी कनेक्‍शन तोडणाऱ्या प्राधिकरणाचे अधिकारी सुमारे १९ लाख ५९ हजार रुपयांची थकबाकी असलेल्या बिल्डरवर मेहरबान का? चार वर्षे फुकट पाणी वापरणाऱ्या बिल्डरवर धनादेश परत आल्याप्रकरणी (चेक बाऊंस) प्राधिकरण काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. 

‘बॉसच्याच घरी बोगस कनेक्‍शन’ या मथळ्याखाली दै. ‘सकाळ’ने ‘सुंदरा गार्डन’ या भव्य निवासी संकुलाच्या पाणी चोरीवर प्रकाश टाकला होता.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नुकतेच निवृत्त झालेले कार्यकारी अभियंता ए. बी. आंटद हे या संकुलात भाड्याने राहात होते. बोगस कनेक्‍शनच्या शोध मोहिमेत त्यांना आपण राहात असलेल्या संकुलाचे कनेक्‍शन बोगस असल्याचे निदर्शनास आले होते. प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरण खोदून काढण्यास सुरवात केली तेव्हा अनेक धक्कादायक मुद्‌द्‌यांवर प्रकाश पडला. २०१४ पासून या निवासी संकुलासाठी प्राधिकरणाचे चार इंची कनेक्‍शनमधून पाणी घेण्यात येत आहे. सुमारे १०० फ्लॅटच्या या स्कीमसाठी कनेक्‍शन चार्जेसही भरले गेले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

श्री. आंटद यांनी सुरू केलेल्या धाडसी कारवाईच्या प्रक्रियेमुळे ‘सुंदरा गार्डन’चा विकसक जेपी असोसिएटसच्या नावाने प्राधिकरणाने १९ लाख ५९ हजार रुपयांचे बिल फाडले होते. गेल्या चार वर्षांतील पाणीबिल आणि त्याच्या थकबाकीपोटी दंड व्याज एवढ्यावरच प्राधिकरणाने कारवाई आटोपती घेतली. जेपी असोसिएटस्‌ने प्राधिकरणाकडे आतापर्यंत पाच, दोन व दोन असे नऊ लाख रुपये धनादेशाने दिले. मात्र, त्यातील तिसरा दोन लाख रुपयांचा धनादेश बॅंकेत न वटताच परत आला आहे. धनादेश परत येऊन आठवडा उलटला तरी याप्रकरणी प्राधिकरणाकडून कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत, हे अधिक गंभीर आहे. 

प्राधिकरण मेहरबान तो...
पाणी चोरीप्रकरणी कायद्यात फौजदारी कारवाईची तरतूद आहे. प्राधिकरणाने याप्रकरणी बिल्डरवर केवळ पाणी वापराचे बिल व त्यावर आजपर्यंतचा दंड एवढीच रक्कम आकारली आहे. पाणी चोरीप्रकरणी स्वतंत्र दंड केलेला नाही, तरीही बिल्डरला टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत कशासाठी दिली? प्राधिकरण बिल्डरवर मेहरबान का? असा सवाल आहे. विशेष म्हणजे पाणी चोरी पकडली जाऊनही बिल्डर पाणी बिलात प्राधिकरणाकडे सवलत मागत असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com