उन्हाचा तडाखा व्यावसायिकांच्या पथ्यावर

तहान शमविण्यासाठी एकीकडे कलिंगडाच्या फोडी खाणारे नागरिक.
तहान शमविण्यासाठी एकीकडे कलिंगडाच्या फोडी खाणारे नागरिक.

मार्केट तेजीत - आर्द्रतेचे प्रमाण ६८ टक्‍क्‍यांवर; शहराचे तापमान ३७ अंशांवर

कोल्हापूर - शहर परिसरात आज तापमान ३४  ते ३७ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहीले. दिवसभर दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दुपारी उन्हाचा चटका कमी जाणवला; मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६८ टक्के इतके झाल्याने नागरिकांच्या अस्वस्थतेत अधिकच भर पडली. परिणामी सॉफ्ट ड्रिंक्‍स, विविध सरबते, पॅकेजिंग केलेले फळांचे रस, लस्सी, ताक, कलिंगडे, कॉटन कपड्यांचे मार्केट ‘बूम’ झाले. 

एरव्ही रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, न्यू पॅलेसमधील तलाव, पंचगंगा नदीकाठ, पाणवठ्यांच्या ठिकाणी जमून किलबिलाट करत स्नानाचा आस्वाद घेणारे पक्ष्यांचे थवेही झाडांवरील सावलीत विसावले. उन्हाने कासावीस झालेल्या नागरिकांनी सरबत, शहाळी, कलिंगडे, अननस, पपईचे काप, सॉफ्ट ड्रिंक्‍स, आईस्क्रिम, उसाचा रस मोठ्या प्रमाणात रिचवला. दुपारी रस्त्यावरील वर्दळ कमी होती. ताक, लस्सीचे डेरे, कलिंगडांच्या फोडींचे स्टॉल्स, सरबतांच्या गाड्या, उसांचे चरक, कोल्ड्रिंक हाऊसेस, आईस्क्रिम पार्लरमध्ये गर्दी होती. 

सकाळी ११ ला लावलेले ताक, लस्सीचे डेरे दुपारी एकपर्यंत खाली होतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कैरीचे पन्हे, मुरांबा, लिंबू, आवळा, कोकम, अन्य फळांचे पॅक केलेल्या रसांना मार्टस्‌मधून जास्त मागणी आहे.

कोशिंबिरीला मागणी 
द्राक्षे, काकड्या, गाजर, हिरव्या पालेभाज्यांचे ढीग हातोहात खपत आहेत. काकडी, टोमॅटो, लाल बीट, दही घालून केलेल्या कोशिंबिरींना ताटाबरोबर मागणी वाढल्याची प्रतिक्रिया खानावळ, हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

रुमाल, टोप्या, गॉग्लसची विक्री
घाम टिपण्यासाठी कॉटनचे रुमाल, गळ्याभोवती घाम जमा होऊ नये म्हणून कॉटनचे मफलर्स, सनकोट, टोप्या, गॉगल्सची विक्री वाढली आहे.         

आर्द्रतेचा परिणाम 
अतितापमानापासून शरीराला थंड ठेवण्यासाठी शरीरात भरपूर घाम येऊ लागतो. परंतु जेव्हा हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीरावर घाम येणे हळूहळू कमी होते. खूप गरम व्हायला सुरवात होऊन अस्वस्थ वाटू लागते. आर्द्रता वाढणे म्हणजे, बाष्पाचे हवेतील प्रमाण वाढते. थंड हवेपेक्षा गरम झालेली हवा बाष्प अधिक पकडून ठेवते. आर्द्रतेचे प्रमाण वाढू लागले की, शरीरावर जमा झालेल्या घामाचे बाष्पीभवन होत नाही; कारण हवेत आधीच बाष्पाचे प्रमाण वाढलेले असते. घामाचे बाष्पीभवन न झाल्याने हा घाम शरिरावर साचून राहतो. उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतात तेव्हा चक्कर येणे, डोके दुखण्याचे प्रकार संभवतात. कधी कधी यामध्ये वयस्कर व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.  

तापमानाची स्थिती  
ॲक्‍युवेदरवरील नोंदीनुसार, शहर परिसरातील आजचे तापमान ३४ ते ३७ डिग्री सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६८ टक्के, पर्जन्य अनुकूलता २० टक्के, दवबिंदूचे प्रमाण १८ टक्के, हवेचा वेग १९ किलोमीटर प्रतितास, आकाशातील ढगांचे प्रमाण ६० टक्के होते. गेले काही दिवस आर्द्रतेचे प्रमाण हे १८, २२, ३५, ४७ टक्केंच्या आसपास राहीले.
 

दररोज फोडी केलेली तीनशे कलिंगडांची विक्री होते. ११ ते ५ वेळेत सर्वाधिक गर्दी असते. प्लेटला दहा ते वीस रुपये दर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असे खूप स्टॉल्स आहेत.
- समीर नुरशेख, स्टॉलधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com