अंधश्रद्धेच्या जोखडातून "चिंध्यापीर' मुक्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

इस्लामपूर - अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या येथील ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजसमोरील एक औषधी वनस्पती तथा "चिंध्यापीर' आज चिंध्यांच्या जोखडातून मुक्त झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 

इस्लामपूर - अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या येथील ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजसमोरील एक औषधी वनस्पती तथा "चिंध्यापीर' आज चिंध्यांच्या जोखडातून मुक्त झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 

अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य विविध उपक्रमप्रमुख डॉ. नितीन शिंदे, प्राचार्य एस. बी. माने, शाखेचे अध्यक्ष विष्णू होनमोरे, पी. व्ही. गायकवाड, योगेश कुदळे, अवधूत कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. अनेक वर्षे इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर आरआयटी कॉलेज समोरील एक झाड लोकांकडून पूजले जात होते. कापडाच्या चिंध्या या झाडावर टाकून लोक आपली श्रद्धा व्यक्त करत होते. त्या झाडावर कपडे टाकल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे अनेक लोक या झाडावर चांगली चांगली कपडे टाकतात. याचा दुष्परिणाम झाडावर होऊन त्याची वाढ खुटली होती. त्याची यात्रादेखील भरवली जाते. महाराष्ट्र अंनिस शाखा इस्लामपूरचे कार्यकर्ते आणि आरआयटी कॉलेजच्या विवेकवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी या अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या झाडावरील कपडे, चिंध्या काढून त्या जाळल्या. झाडाला पाणी घातले व आसपासचा परिसर स्वच्छ केला. अनेक वर्षांनी झाडाला मोकळा श्‍वास मिळाला. 

वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्रा. पी. व्ही. गायकवाड म्हणाले, "भूमध्य सागरी प्रदेश उगमस्थान असलेले हे पाचुंद्याचे झाड आहे. त्याच्या फळे, फुले व बियांचा वापर खोकला, ताप व कर्करोगावर वेदनाशामक औषध तयार करण्यासाठी होतो. याची फळे लोणची करण्यासाठीही वापरतात. आपल्या भागात हे झाड दुर्मिळ आहे. कमी पाण्याच्या ठिकाणी ही झाडे मोठ्या प्रमाणात उगवतात.'' 

अंनिसचे कार्यकर्ते अजय भालकर, सचिन पाटील, रितेश अदलिंगे, श्‍वेता नागणे, शुभम आलमवार, सुदर्शन जगताप, अभिजित चंदनकर, उत्कर्ष जाधव, मनाली जाधव, योगेश्‍वरी पाटील, लक्ष्मण कवितके, ओंकार हारगे, अनिकेत नांगरे, उत्कर्ष पाटील, रितेश अदलिंगे, विनय कांबळे आदींनी झाड स्वच्छ करून चिंधीमुक्त केले. 

मला मुक्त करा... झाडासारखे जगू द्या 
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पाचुंद्याच्या झाडाच्या शेजारी एक फलक उभारला. त्यात "मला मुक्त करा' असे आवाहन केले आहे. "मी पाचुंद्याचे झाड आहे. मी लोकांच्या अनेक कामासाठी उपयोगी पडतो. मला कपडे लागत नाहीत. मी कोणाच्याही इच्छा पूर्ण करीत नाही. मी माणसांना प्राणवायू पुरवतो. कृपया माझ्यावर कपडे टाकू नका. माझा जीव घुसमटतो. मला मुक्त करा. कपडे गरजू माणसांना द्या. मला झाडासारखे जगू द्या...' असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: superstition issue