सांगलीत कोटी सूर्यनमस्कार, अवकाश कार्यशाळा गाजली

सांगलीत कोटी सूर्यनमस्कार, अवकाश कार्यशाळा गाजली

शैक्षणिक क्षेत्रात गतवर्षी सांगली शिक्षण संस्थेने एक कोटी सूर्यनमस्काराचा केलेला उपक्रम आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने नासा व इस्त्रोच्या सहकार्याने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय अवकाश कार्यशाळा हे चर्चेतील उपक्रम ठरले. त्याशिवाय इस्लामपूरच्या प्रकाश शिक्षण संस्थेस यंदा एमबीबीए. शिक्षणाची परवानगी मिळाली, तर तीर्थंकर शिक्षण संस्थेने फार्मसी महाविद्यालय सुरू केल्याची नोंद यंदाच्या वर्षी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी आहेत.
 

एक कोटी सूर्यनमस्कार
सांगली शिक्षण संस्थेने दोन वर्षांपूर्वी महालेझीमचा विश्‍वविक्रम केला होता. त्यांनीच यंदा दोन वेगळे उपक्रम केले. यामध्ये एक होता तो एक कोटी सूर्यनमस्काराचा. यंदा रथसप्तमी दिवशी (ता. १४ फेब्रुवारी) कृष्णा नदीकाठावरील माई घाटावर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक कोटी सूर्य नमस्कार घालण्याचा उपक्रम केला. यामध्ये संस्थेच्या विविध शाळांमधील पंधरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

एक मिनिटात ज्ञानेश्‍वरी
सांगली शिक्षण संस्थेनेच यंदा आणखी एक उपक्रम केला तो म्हणजे एक मिनिटात ज्ञानेश्‍वरी लिहिण्याचा. संस्थेच्या सर्व शाळांमधील ९७०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक ओवी लिहिण्याचा सराव करण्यात आला होता. त्यानंतर एकाच दिवशी ज्ञानेश्‍वरीच्या सर्व म्हणजे ९०३७ ओव्या विद्यार्थ्यांनी एक मिनिटात लिहून संपूर्ण ज्ञानेश्‍वरी एक मिनिटात लिहिण्याचा उपक्रम पार पाडला. हा उपक्रम तिसरी ते आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांनी केला. गोकुळ अष्टमीस विद्यार्थ्यांनी त्यांना ठरवून दिलेली ओवी एक मिनिटात लिहून पूर्ण केली. अशा रीतीने एक मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्‍वरी लिहिली गेली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा उपक्रम झाला. 

त्याच्या दोन प्रती करण्यात येत असून एक संत ज्ञानेश्‍वरांची समाधी असलेल्या आळंदी येथे देण्यात येणार आहे.

सांगली शिक्षण संस्थेच्याच मो. द. बर्वे प्राथमिक शाळेतील शिक्षक संजीव चौगुले यांना यंदाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. 

आंतरराष्ट्रीय अवकाश स्कूल कार्यशाळा लठ्ठे एज्युकेशन संस्थेच्या वतीने यंदा नासा आणि इस्त्रोच्या सहकार्याने इंटरनॅशनल स्कूल ऑन स्पेस सायन्स या विषयावर ही कार्यशाळा होती. यामध्ये अमेरिका, नॉर्वे, स्वित्झर्लंड, केनिया, नायजेरिया आदी देशांमधून १२० संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. भविष्यात अवकाश संशोधक तयार करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये नासाच्या शास्त्रज्ञ डॉ. मधुलिका गोहातकुरता, इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नाथगोपाल स्वामी आदी विविध अवकाश संशोधकांनी मार्गदर्शन केले.

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने यंदापासून मुलींसाठी सायकल बॅंक हा उपक्रम सुरू केला. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला.
याशिवाय तीर्थंकर शिक्षण संस्थेने डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालय सुरू केले.,तर सांगली शिक्षण संस्थेने मालू हायस्कूलमध्ये इंग्लिश माध्यमाचीही शाळा सुरू केली. शांतिनिकेतनच्या कलाविश्‍वमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळांचे आयोजन केले. सांगलीवाडीच्या पतंगराव कदम महाविद्यालयातही अनेक कार्यशाळा पार पडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com