शिस्तीसाठी परवाने केले निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सातारा - वाहनचालकांमध्ये शिस्त लागावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक धोरण अवलंबून गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांसाठी १७५ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारे व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

सातारा - वाहनचालकांमध्ये शिस्त लागावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक धोरण अवलंबून गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांसाठी १७५ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारे व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे व मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचे वाहनधारकांकडून काटेकोर पालन होणे आवश्‍यक असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबर अपघातांची संख्याही कमी होते. वाहतूक पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होते. दंडात्मक कारवाईव्यतिरिक्त आपण केलेल्या चुकीची जाणीव चालकाला व्हावी, यासाठी त्याचा वाहन चालविण्याचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आहेत. सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनीही या अधिकाराचा वापर करून गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांसाठी १७५ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले आहेत.

वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, वाहनातून क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणे, माल वाहतुकीच्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, दारू पिऊन वाहन  चालविणे, हेल्मेट न वापरणे तसेच सिटबेल्ट न लावणे अशा विविध कारणांसाठी या कारवाया करण्यात आल्या. दारू पिऊन वाहन चालविणे तसेच गाडी चालविताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे या दोन कारणांसाठी कडक धोरण स्वीकारत संबंधित वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. उर्वरित कारणांसाठी एक महिन्याचे निलंबन करण्यात आले आहे.

दारू पिऊन वाहन चालविणे व गाडी चालविताना मोबाईलवर बोलण्यामुळे अपघातांची शक्‍यता वाढते. त्यामुळे येत्या काळात अशा प्रकारासाठी चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याच्या कारवाईचे प्रमाण वाढवणार आहे. नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.

Web Title: Suspended licenses for discipline