जलतरण तलाव... पण, गाळाने भरलेला

शैलेन्द्र पाटील
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सातारा - एप्रिल महिना उजाडला की नगरपालिकेच्या जलतरण तलावाकडे बालगोपाळांचे पाय वळत. गेल्या दोन पिढ्यांमध्ये जणू हा एक पायंडाच पडलेला. हा तलाव बंद असल्याने गेल्या चार वर्षांत ही परंपरा खंडित झालीय. तलावाचे नूतनीकरण किंवा तात्पुरती दुरुस्ती करायची म्हटले तरी त्यासाठी निधी हवा. तीन वर्षांत १५ लाख रुपयांची जुळवाजुळवही पदाधिकाऱ्यांना करता आली नाही. या पैशांच्या जुळवाजुळवीसाठी आणखी किती वर्षे लागतील, असा भाबडा सवाल तलाव पोहण्यासाठी खुला होण्याची आस लावून बसलेल्या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 

पालिकेच्या या तलावात २०१३ च्या मे महिन्यात युवकाचा बुडून मुत्यू झाला. त्यानंतर हा तलाव आजतागायत बंद आहे. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या तारखेला हा तलाव नागरिकांना खुला केला जात होता. एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत तलाव सुरू असायचा. या तलावाशिवाय शहरात आणखी चार जलतरण तलाव आहेत. मात्र, पाच रुपये एवढे नाममात्र शुल्क आकारून पालिका सर्वसामान्यांची सोय पाहायची. त्यामुळे सर्वसामान्यांचा या तलावाकडे अधिक ओढा होता. 

जलतरण तलावाचे नूतनीकरण, त्यालगत दुमजली इमारतीत बॅडमिंटन हॉल व रायफल शूटिंगसाठी रेंज असा सुमारे तीन कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव पालिकेने तयार केला. मात्र, या तलावालगतच्या जागेत बगीचाचे आरक्षण असल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला. 

मोती तळ्यातील मूर्ती विसर्जन बंद केल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून जलतरण तलावात गणेश विसर्जन करण्यात येते. अद्यापि या तलावात मूर्तींचा राडारोडा तसाच आहे, तसेच रासायनिक घटकांमुळे पाण्याची दुर्गंधी येत आहे. अत्यावश्‍यक कामे करून तलाव तत्काळ सुरू करायचा झाल्यास सुमारे १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण तलावाचे नूतनीकरण करायचे झाल्यास ५० लाख, तर अत्याधुनिक सुविधांनीयुक्‍त तलाव नव्याने बांधायचा झाल्यास हा खर्च हौसेनुसार ९० लाखांपर्यंत जाऊ शकतो, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या चार वर्षांत या तलावाकडे तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही. परिणामी या तलावातील जलतरण केवळ नावालाच शिल्लक आहे! 

...ही आहे वस्तुस्थिती
आवश्‍यक कामांसाठी निधी - १५ लाख
तलावाच्या नूतनीकरणासाठी - ५० लाख
अत्याधुनिक सुविधांसाठी लागणार - ९० लाख

अर्थसंकल्पाला मंजुरी मिळताच तलाव सुरू करण्यासाठी आवश्‍यक कामे तातडीची सुरू करण्यात येतील. काहीसा उशिर झाला असला तरी ही कामे लवकर व चांगल्या दर्जाची करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- किशोर शिंदे, सभापती, सार्वजनिक बांधकाम, सातारा पालिका

क्रीडा संकुलातील जलतरण तलाव फुल्ल!
छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने आठ बॅचेस केल्या आहेत. त्यामध्ये चार बॅचेस नियमित आहेत. त्यातील एक महिलांची आहे. नियमित बॅचेससाठी ८०० रुपये, तर प्रशिक्षणार्थींसाठी १२०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या सर्व बॅचेसमध्ये सुमारे ५० ते ६० जणांना प्रवेश देण्यात येतो. या जलतरण तलावावर आठ जीवरक्षकांची नेमणूक आहे. सध्याच्या सर्व बॅचेसमध्ये प्रवेश फुल्ल झाले असून सुमारे ६० जणांची मागणी प्रतीक्षित आहे.