"स्वाईन' चा विळखा, व्हेंटिलेटरचा तुटवडा 

"स्वाईन' चा विळखा, व्हेंटिलेटरचा तुटवडा 

कोल्हापूर - शहर व जिल्ह्याला एकीकडे स्वाईन फ्लूचा विळखा पडला असता यावर उपचार करणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देणाऱ्या व्हेंटिलेटरचाच तुटवडा आहे. सर्व विभागांत मिळून 50 व्हेंटिलेटरची गरज असताना रुग्णालयात केवळ पंधराच व्हेंटिलेटर आहेत, त्यापैकी सात व्हेंटिलेटर सुस्थितीत असूनही त्याचा वापर केला जात नाही. 

सुमारे 635 खाटांच्या या रुग्णालयात ट्रामा केअर युनिट, नवजात शिशुगृह, स्वाईन फ्लू कक्ष व मेडिकल आयसीयू याठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे. 

स्वाईन फ्लू रुग्णांसाठी 10 खाटांचा स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे, पण त्या ठिकाणी केवळ तीनच व्हेंटिलेटर आहेत. नवजात शिशुगृहात तर 10 खाटांची व्यवस्था आहे, प्रत्यक्षात या ठिकाणी रोज 30 ते 40 नवजात बालके उपचारासाठी दाखल होतात, पण या वॉर्डमध्ये केवळ दोनच व्हेंटिलेटर आहेत. हे व्हेंटिलेटरही रोटरी क्‍लबने भेट म्हणून दिलेले आहेत. या रुग्णालयाच्या रुग्ण सेवेवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे ढळढळीत उदाहरण यानिमित्ताने पुढे आले आहे. 

दोन वर्षांत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण जिल्ह्यात नव्हता. 2014 मध्ये या आजाराने थैमान घातले होते. यावर्षीही तशीच परिस्थिती आहे. आतापर्यंत 21 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात या आजारावरील उपचार घेणे प्रचंड खर्चिक आहे. एका-एका रुग्णांचे खासगी रुग्णालयातील बिल सुमारे तीन लाखांच्या आसपास झाल्याची उदाहरणे आहेत. पुढील उपचार पैशाअभावी करता येणे शक्‍य नसल्याने, असे रुग्ण शेवटच्या क्षणी सीपीआरमध्ये दाखल केले जातात, पण येथील अपुऱ्या सुविधांमुळे या रुग्णांवर योग्य ते उपचार होत नाहीत. यात मोठा अडथळा आहे, तो अपुऱ्या व्हेंटिलेटर संख्येचा. 

स्वाईन फ्लू हा आजार संसर्गजन्य असूनही अशा रुग्णांच्या छातीचा एक्‍स-रे काढायचा झाल्यास त्याला वॉर्डपासून चालत एक्‍स-रे कक्षात नेले जाते. यासाठी पोर्टेबल एक्‍स-रे मशीनची गरज आहे, असे मशीन हृदयशस्त्रक्रिया विभागात आहे, पण या कक्षात रुग्णांना खुल्या वातावरणातच फिरू दिले जाते, ही गंभीर बाब आहे. 

स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांच्या खोकल्यातून, शिंकण्यातून दुसऱ्या व्यक्तीलाही हा आजार होऊ शकतो, हे माहीत असूनही या कक्षासाठी स्वतंत्र एक्‍स-रे मशीन दिले जात नाही. 

आजाराची लक्षणे 
तीव्र स्वरूपाची घसादुखी, ताप, खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी, धाप लागणे व काही रुग्णांत शौचाला होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. 1 ते 7 दिवस हा आजार रुग्णांत राहू शकतो. या काळातच त्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करणे आवश्‍यक आहे. 

तपासणीसाठी पाच प्रयोगशाळा 
कोल्हापुरात स्वाईन फ्लूची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातील स्त्राव तपासावा लागतो. या तपासणीसाठी राज्यात दोन सरकारी व पाच सरकारमान्य खासगी प्रयोगशाळा आहेत. कोल्हापुरातील रुग्णांचा स्त्राव पुणे येथील सरकारी प्रयोगशाळेत पाठवला जातो. दुसरी सरकारी प्रयोगशाळा नागपूर येथे आहे. कोल्हापुरात हे तपासणारी यंत्रणा नसल्याने अनेक अडचणी येतात. 

दृष्टिक्षेपात यावर्षीचे स्वाईन फ्लूचे रुग्ण (13 ऑगष्टपर्यंतची माहिती) 
संशयित रुग्ण- 246 
अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण- 110 
मृत रुग्ण- 21 
रुग्णालयात दाखल रुग्ण- 29 
यापैकी पॉझिटीव्ह रुग्ण- 24 
सीपीआरमध्ये दाखल- 4 यापैकी 3 पॉझिटीव्ह 
खासगी रुग्णालयात दाखल- 25 पैकी पॉझिटीव्ही 21 

सीपीआरमधील व्हेंटिलेटरची संख्या (कंसात त्या विभागाला आवश्‍यक व्हेंटिलेटर) 
ट्रामा केअर युनिट- 15 (7), नवजात शिशुगृह- 10 (2), स्वाईन फ्लू कक्ष- 3 (7), मेडिकल आयसीयू- 3 (13) 

"ट्रामा' मधील व्हेंटिलेटर वापराविना 
सीपीआरमध्ये नव्याने सुरू केलेले ट्रामा केअर युनिट अजून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे, पण या कक्षात सात व्हेंटिलेटर सुस्थितीत आहेत. हा कक्षच सुरू नसल्याने त्याचा वापर होत नाही. अशा परिस्थितीत हे व्हेंटिलेटर आवश्‍यक असलेल्या स्वाईन फ्लूचा किंवा नवजात शिशुगृहात वापरणे आवश्‍यक असताना याकडे कोणाचेही लक्ष नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com