मुलांचे भवितव्य पदवीधरांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील प्रकार; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

तळमावले - ढेबेवाडी-तळमावले विभागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. या शाळांतील शिक्षकांच्या पात्रतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य पदवीधरांच्या हाती गेल्याचेच वास्तव समोर येत आहे. या प्रकारातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात आले आहे. 

या विभागात तळमावले, कुंभारगाव, गुढे, ढेबेवाडी आदी परिसरामध्ये मोठ्या संख्येने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले असल्याचेच दिसते. पालकांचाही प्रतिष्ठेसाठी याच शाळेत मुलाला प्रवेश घेण्याकडे वाढता कल दिसतो. शाळेची गुणवत्ता न बघताच पालकही पाल्याचा प्रवेश निश्‍चित करताना दिसतात. संबंधित शाळेविषयी, शाळेच्या गुणवत्तेविषयी कसलीही माहिती न घेताच पालकांकडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रवेश झाल्यानंतर शाळा प्रशासनाकडून वर्षभर विविध क्‍लुप्त्या लढवून फी आकारणी सुरूच असते. ही फी सुद्धा देताना पालक नकार देत नाहीत. 

इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गुणवत्तेविषयी माहिती घेताना शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेचा प्रश्‍न समोर आला आहे. शासकीय नियमानुसार, डी. टी.एड., बी. एड. धारक उमेदवारच शाळेत शिक्षक म्हणून सेवा देवू शकतो.

मात्र, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अपवादानेच  डी. टी.एड., बी. एड. धारक शिक्षक असल्याचे दिसते. या शाळांमध्ये बारावी, पदवीधारकांच्या हाती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सोपवल्याची बाब समोर येत आहे.

शिक्षक भरतीतील सर्व नियम डावलून खासगी संस्थाचालकांकडून शिक्षकांच्या भरतीचा गोलमाल केलेला दिसतो. इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळा या विनाअनुदानित असल्यामुळे शिक्षण विभागाचे नियंत्रण असूनही नसल्यासारखे दिसते. शिक्षकांच्या पात्रतेच्या प्रश्‍नात ही बाब प्रकर्षाने समोर येते. या प्रकाराला आळा घालण्याची गरज असून अशा संस्थाचालकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील गुणवत्तेबरोबर शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी डी. एड., बी. एड. झालेले शिक्षक भरती करणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसणे गरजेचे आहे.
- अजित पाटील, पालक, तळमावले