कष्टकऱ्यांसाठी तनिष्का झाल्या अन्नपूर्णा 

शाम जोशी
गुरुवार, 16 मार्च 2017

सोलापूर - टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील तनिष्का सदस्यांनी सामाजिक कामांबरोबरच शेळीपालन व दुग्धव्यवसायातून आर्थिक पत मिळवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी एकत्र येऊन ऊसतोडणी कामगार, शेतमजूर, चालक, क्‍लिनर, ग्रामस्थांसाठी अवघ्या 30 रुपयांत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. महागाईच्या काळात 30 रुपयांतील थाळीचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

गटप्रमुख मंगल ओहोळ, किशोरी अंकुशराव, जयश्री लोंढे, माधुरी ओहोळ, रंजना वसेकर, इंदुमती तांदळे, पिंकुशा कापसे, विजया अंकुशराव, बाई चव्हाण व सरिता जानकर या तनिष्कांनी गेल्या महिन्यापासून अवघ्या 30 रुपयांत भोजन देण्यास सुरवात केली आहे. हॉटेल किंवा खानावळीतील 70 ते 80 रुपयांचे जेवण परवडणारे नसल्याने अनेक कष्टकरी आपोआपच या केंद्राकडे आकृष्ट झाले. तनिष्कांना रोजगारही मिळाला अन्‌ समाजसेवाही साधली गेली आहे. मिळालेल्या प्रतिसादाने तनिष्कांचा हुरूप वाढला आहे. 

या परिसरात भीमा सहकारी साखर कारखाना असल्याने वर्दळ असते. दोन पोळ्या अथवा भाकरी, सुकी भाजी व पातळ भाजी, भात, मीठ, लिंबू, शेंगा चटणी असे पूर्ण भोजन दिले जात असल्याने जेवणारा समाधानाने बाहेर पडतो. डबा देण्याचीही सोय करण्यात आली आहे. 

होलसेल दरात धान्यखरेदी, तनिष्कांच्या शेतातीलच भाजी वापरतो व स्वतःच सर्व कामे करतो. यामुळे 30 रुपयांत भोजन देणं परवडतं. सर्व तनिष्का वारानुसार विभागणी करून काम करत असल्याने सर्वांनाच त्याचा फायदा होतो. 
- मंगल ओहोळ, गटप्रमुख, टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) 

तनिष्कांनी सुरू केलेल्या या खानावळीमधे मला घरीच जेवत असल्याचा अनुभव आला. कमी किमतीत; पण रुचकर व दर्जेदार जेवण मिळत असल्याने छान वाटले. सर्व पदार्थ खूपच चविष्ट होते. 
- ब्रह्मदेव जाधव, शेतकरी, फुलचिंचोली 

Web Title: Tanishka activities to just Rs 30 meal