जिल्ह्यात तनिष्का निवडणुकीची धूम 

जिल्ह्यात तनिष्का निवडणुकीची धूम 

कोल्हापूर - महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा ध्यास घेऊन तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना अंतर्गंत झालेल्या निवडणुकांमध्ये समाजाच्या विविध स्तरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्यातील 38 मतदान केंद्रांवर रांगा लावून झालेल्या मतदानामुळे निवडणुकीतील चुरस वाढली. सकाळी 8 वाजता मतदानास सुरवात झाली आणि दुपारी दोनपर्यंत महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. दरम्यान, मिसकॉलद्वारेही उच्चांकी मतदानाची नोंद झाली. 

शहरातील सहा मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच मतदानाची धूम सुरू झाली. मतदान केंद्रात प्रवेश होताच निवडणूक अधिकारी कक्षाच्या टेबलावर मतदानाची नोंदणी होत होती. त्यानंतर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष मतपेटीजवळ जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देत मतपत्रिका पेटीत टाकत होत्या. महिला मतदारांनाच मतदानाचा हक्क असल्याने सकाळच्या सत्रात जेमतेम प्रतिसाद होता. सकाळी अकरानंतर मात्र बहुतेक महिला घरांतील कामे आवरून गटागटाने मतदानासाठी येत असल्याचे चित्र जाधववाडी, राजारामपुरी, शिवाजी पेठ, महाद्वार रोड या परिसरात होते, तर अनेकजणी आपल्या मैत्रीणींसह दुचाकीवरून केंद्रावर आल्या. 

महिलांसाठी उपयुक्त अशा विविध उपक्रमांत सहभाग तसेच नेतृत्वाची आवड असणाऱ्या महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. गेली आठवडाभर त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. 

असाही आदर्श 

स्थानिक स्वराज्य संस्थापासून लोकसभा निवडणुकीपर्यंतच प्रत्येक निवडणुकीत वारेमाप खर्च होतो. प्रचारातील टोकाच्या ईर्षेमुळे वाद होतात. अशा सर्व गोष्टींना फाटा देत केवळ महिलांचे उज्ज्वल भवितव्य, महिलांचा सन्मान आणि त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव एवढ्या मुद्‌द्‌यांवर निवडणूक पूर्ण शांततेत व सुरळीत कशी पूर्ण संपन्न होते, याची प्रचिती तनिष्का निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्याला मिळाली. 

मिसकॉलची उत्सुकता 

ज्या महिला मतदान करण्यासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, अशा महिलांसाठी मिसकॉल पद्धतीने मतदानाची सुविधा उत्सुकतेची ठरली. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान वाढावे यासाठी अनेक महिला मतदांरानी आपल्या नातेवाइकांसह पै-पाहुण्यांनाही मिसकॉल करण्याची विनंती केली. केवळ विनंती करून न थांबता त्या वारंवार सर्वांना त्याची आठवणही करून देत होत्या. 

घरकामातून काढला वेळ 

जाधववाडीतील हनुमान मंदिर येथे महिलांचा मतदानासाठी मोठा प्रतिसाद लाभला गृहिणींपासून ते नोकरदार महिलांनी सकाळीच मतदान केले. अनेक महिला मुलांना शाळेला सोडण्यासाठी जाताना, भाजीपाला आणण्यासाठी जाता जाता मतदानासाठी हजेरी लावली. ""महिलाही समाजाचे नेतृत्व करू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्याबरोबर सामाजिक कार्य करण्यासाठी ती सक्षम आहे, तिलाही संधी पाहीजे.'' या उद्देशाने नियमित जबाबदाऱ्यातून वेळ काढून मतदानासाठी आल्याचे संगीता जाधव, रोहिणी भोसले, राजश्री पाटील यांनी सांगितले. 

महिलांच्या कर्तृत्वाला संधीची अपेक्षा 

महालक्ष्मी धर्मशाळा मतदान केंद्रावर सकाळपासून महिला मतदारांची गर्दी होती. या परिसरात व्यवसायिक कुटुंबाची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक महिलांना घरातील काम तसेच घरगुती व्यवसायातही मदत करावी लागते. त्यातून त्या समाजकार्यात सहभागी होतात. त्यातून वेळ काढून त्या मतदानासाठी आल्या. महिलांचा आत्मविश्‍वास वाढविण्यास तनिष्का व्यासपीठ उत्तम माध्यम आहे. त्यातून निवडून येणाऱ्या महिला समाजातील इतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आग्रही भूमिका मांडू शकतील, असा विश्‍वास सुजाता मेवेकरी, उज्ज्वला रांगणेकर, प्रतिमा देसाई आदी महिलांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com