तारळी धरण व्यवस्थापनाची दिरंगाई कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

तारळे - तारळी धरणाच्या क्विक सर्व्हिस गेटचे बोनेट काल अचानक तुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह नदी पात्रात आल्याने परिसरात घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास इमर्जन्सी गेट बसवून गळती थांबवली. धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, व्यवस्थापनाचे थोडेसे दुर्लक्षच कालच्या घटनेला थोडीशी का होईना दिरंगाई कारणीभूत ठरली हे निश्‍चित.

तारळे - तारळी धरणाच्या क्विक सर्व्हिस गेटचे बोनेट काल अचानक तुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह नदी पात्रात आल्याने परिसरात घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास इमर्जन्सी गेट बसवून गळती थांबवली. धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, व्यवस्थापनाचे थोडेसे दुर्लक्षच कालच्या घटनेला थोडीशी का होईना दिरंगाई कारणीभूत ठरली हे निश्‍चित.

५.८५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या तारळी धरण युती काळात मंजूर झाले. १९९८ मध्ये प्रत्यक्षात बांधकामाला सुरवात झाली. सुरवातीपासूनच काम वादातीत राहिले. अखेर दीर्घकाळाने २०१३ मध्ये तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. धरणाला गळतीचे ग्रहण तेव्हापासूनच आहे. मध्यंतरी विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यात तारळी धरणाचाही उल्लेख केला होता. हे धरण निकृष्ट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक शासकीय समितीने येऊन बांधकामाचे परीक्षण करून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता; परंतु भिंतीतून आजही सुरू असलेली गळती, तसेच गेल्या वर्षी पाणी पातळी खालावल्यावर पाण्याकडील भिंतीचे उघड्या पडलेल्या दगडांनी धरणाच्या कामाचे वास्तव समोर आले होते. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आपसुक उभे राहते, तसेच वेळोवेळी स्थानिकांनीही कामाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. येथील लोकांच्या वारंवार बोलण्यातून धरणाच्या सुरक्षितते वारंवार धास्ती दिसून येते. धरणात सुमारे १५ ते १५ वर्षांपूर्वी क्विक सर्व्हिस गेट बसविण्यात आले होते. संपूर्णपणे लोखंडाचे असलेले हे गेट सतत पाण्याच्या संपर्कात राहुन गंजले. गंजून काही भाग कमकुवत होऊन पाण्याच्या दाबाने ते अखेर काल तुटले अन्‌ गळती झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या धरणाचे वेळोवेळी परीक्षण होत असते. त्यामध्ये भिंतीमधील गॅलरीतून आतील भागाचे व मेकॅनिकल पार्टच्या पण तपासण्या होत असताना कालच्या घटनेने या सर्व तपासण्यांवर प्रश्नचिन्ह उभे केलेले आहे. अशा तपासण्यावेळीच ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली होती; परंतु दुर्दैवाने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यापूर्वीच कालची घटना घडली. कालच्या घटनेने धरण व्यवस्थापन खडबडून जागे झाले असून, क्विक सर्व्हिस गेट बसविण्याचे काम हाती घेऊन युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम होईल, अशी आशा आहे. खरे तर व्यवस्थापनाने या परीक्षण व तपासण्यांवर अधिक काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. 

तारळी धरणाचे बांधकाम हे कोलग्राउट पद्धतीने झाले आहे. तशी धरण बांधकामाची ही वेगळी पद्धत आहे. दुर्दैवाने यात काही त्रुटी राहिल्याने धरणाची आजवर गळती सुरू असलेली पाहायला मिळते अन्‌ ही अधिकारीही 
मान्य करतात. ही गळती काढण्यासाठी ग्राउटिंगचा वापर करण्यात येत असून, गळती थांबविण्यात बऱ्यापैकी यश मिळत आहे. पाण्याचा साठा जसजसा खाली जाईल, तसतसे ग्राउटिंगने गळतीवर शंभर टक्के नियंत्रण मिळविता येईल, असा आशावाद अधिकाऱ्यांना आहे. ज्यावेळी शंभर टक्के गळती थांबेल तेव्हाच खऱ्या अर्थाने धरणाच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित होणारे प्रश्न थांबतील.

हीच घटना दोन दिवसांनी घडली असती तर... 
कालच्या अचानक आलेल्या प्रवाहाने पाल यात्रेवर संकट ओढवले होते. तीन राज्यांमधील भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाची यात्रा तीनच दिवसांवर आली आहे. काल वाळवंटात दुकाने थाटण्यास सुरवात झाली असतानाच या घटनेने ट्रस्ट व यात्रा समितीला पळापळ करून खबरदारी घ्यावी लागली, तर तात्पुरत्या स्वरूपात नदी पात्रात उभारण्यात येणारा मिरवणूक मार्गाचा पूल त्या पाण्याने वाहून गेला. हीच घटना अजून दोन दिवसांनी घडली असती तर पाल यात्रेत मोठा अनर्थ घडला असता. मल्हारी मार्तंडाच्याच कृपेने हा अनर्थ टळला असल्‍याची भावना ग्रामस्‍थ व्‍यक्‍त करीत होते.

Web Title: Tarali dam caused the delay management