तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

... तर धडा शिकवू
कायदा पायदळी तुडविणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कारवाई करताना महापालिका प्रशासनाने जर नांगी टाकली तर भविष्यात शहरातील कोणत्याही गरिबाचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतिक्रमण पाडण्याचे धाडस करू नये, अन्यथा शिवसेना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर - तावडे हॉटेल- गांधीनगर मार्गावरील महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेतर्फे तावडे हॉटेल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण केलेली बांधकामे पाडण्याची कारवाई महापालिकेला मंत्रालयात बैठक बोलाविल्याने थांबवावी लागली. या निषेधार्थ तसेच येथील अतिक्रमण पाडण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनासाठी सकाळी अकरापासून कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेऊन जमत होते. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तावडे हॉटेल पुलाच्या बाजूंना शिवसैनिकांनी घोषणा देत रस्ता अडविण्यास सुरवात केली.

या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे पाडलीच पाहिजेत’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आरक्षित जागेवरील अतिक्रमण नियमित होऊच शकत नाही, असा कायदा असताना गांधीनगर मार्गावरील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाला अभय देण्याचे कारण काय? केवळ पोलिस बंदोबस्ताचे कारण देत थांबविण्यात आलेली कारवाई संशय निर्माण करणारी आहे. आयुक्‍तांनी पोलिस बंदोबस्त मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनास पत्र देऊनही बंदोबस्त मिळाला नाही. या प्रकरणात माशी कुठे शिकली, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे राजकीय दबावाला बळी न पडता व मंत्रालयात होणाऱ्या बैठकीतील निर्णयाची वाट न पाहता आयुक्‍तांनी तावडे हॉटेल परिसरातील कारवाई करणे आवश्‍यक आहे. अतिक्रमण काढण्यास पोलिस बंदोबस्त मिळत नसेल तर शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करतील.  

आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, राजू पाटील, रवी चौगुले, दुर्गेश लिंग्रस आदी सहभागी झाले होते.

Web Title: tawade hotel area encroachment shivsena agitation