गुरुजींची बॅंक गैरप्रकारांच्या गर्तेत

court
court

माजी अध्यक्षांसह 29 संचालकांवर नोकरभरती, अपहारप्रकरणी गुन्हा

सातारा : नोकरभरतीमध्ये गैरप्रकार तसेच पदोन्नती, कोअर बॅंकिंग प्रणाली बसविण्याची प्रक्रिया, महाबळेश्‍वर शाखेच्या जागेच्या खरेदीमध्ये गैरप्रकार व अपहार करून बॅंकेचे नुकसान केल्याप्रकरणी शिक्षक बॅंकेच्या माजी अध्यक्ष व उपाध्यक्षांसह 30 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हा न्यायालयीन गुन्हा दाखल झाला आहे.

अध्यक्ष विठ्ठल अंकुशराव माने, उपाध्यक्ष विजय बापूसाहेब जाधव, संचालक रवींद्र बाबूराव भंडारी, मोहन राजाराम सातपुते, हेमंतकुमार मारुतराव जाधव, रणजित अंकुश गुरव, सुलभा तानाजी सस्ते, कामिनी महेंद्र शिलवंत, वनिता हणमंतराव भोईटे, अरुण तुकाराम पाटील, मनोहर किसन कदम, सुरेश विठोबा दुदुस्कर, संजय हरिबा ओंबळे, नारायण महादेव शिंदे, संतोष जगन्नाथ शिंदे, मच्छिंद्र विश्‍वासराव ढमाळ, सोमनाथ बाजीराव लोखंडे, हणमंत किसनराव जगताप, रामचंद्र तुकाराम कदम, रामराव पांडुरंग बर्गे, विश्‍वंभर कृष्णराव रणवरे, शशिकांत शंकर बागल, जयप्रकाश वसंतराव साबळे, हणमंत संभाजी जगदाळे, लक्ष्मण दिगंबर काळे, कृष्णराव दत्ताजीराव जाधव, दिलीप हणमंत चौधरी, प्रमोद सदाशिव परामणे, दत्तात्रय भिकू भिलारे तसेच बॅंकेची भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीचे के. एम. चिटणीस अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष बलवंत संभाजी पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, 2013-14 मध्ये संगणकीकरणामुळे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्‍यकतेपेक्षा जास्त झाली होती. त्यामुळे बॅंकेने सेवानिवृत्ती योजना जाहीर केली. त्यामध्ये 15 ते 20 कर्मचारी निवृत्त झाले. त्यानंतर बॅंकेच्या संचालक मंडळाने तीन वेळा नवीन नोकरभरती न करण्याचा ठराव केला होता. तरीही तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे नोकरभरती केली. त्यासाठी चिटणीस यांच्या कंपनीला नियुक्त केले होते. त्याला हाताला धरून तत्कालीन संचालक व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना उत्तीर्ण झाल्याचे खोटे व बेकायदेशीर गुण दाखवून 37 जणांची भरती केली. त्यामध्ये सहकार खात्याने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केले. बॅकलॉग नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे बॅंकेवर आर्थिक बोजा पडला. हा गैरव्यवहार व अफरातफर कायदेशीर दाखविण्यासाठी आवश्‍यकता नसताना बॅंकेच्या 11 पैकी सात शाखांमध्ये शिफ्ट पद्धत अवलंबिली. तसेच निकष डावलून 2010 ते 2015 या कालावधीत बेकायदेशीर बढत्या दिल्या. बॅंक व कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या कराराचे पालन केले नाही.

कोअर बॅंकिंग प्रणाली सुरू करताना नवीन सॉफ्टवेअर खरेदी व त्याबाबतच्या सेवा-सुविधेचा करार बेकायदेशीर पद्धतीने केला. त्यामुळे बॅंकेला खरेदीसाठी 29 लाख व देखभालीसाठी महिना साडेबारा हजार रुपयांचा प्रति शाखा भुर्दंड बसला. तसेच एसटीएम मशिनसाठी चार लाख रुपये देण्यात आले. मात्र, अद्यापही ती सुविधा सुरू झालेली नाही. त्याचबरोबर बॅंकेच्या महाबळेश्‍वर शाखेसाठी जागेच्या खरेदीमध्येही गैरप्रकार करून 42 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याबाबत लेखापरीक्षण अहवालमध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा तपासासाठी दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक चौगुले तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com