टेंभू, उरमोडीबाबत तत्काळ प्रस्ताव

टेंभू, उरमोडीबाबत तत्काळ प्रस्ताव

सांगली - उरमोडी आणि टेंभूच्या पाण्यासाठी आज आटपाडीच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे महामंडळाच्या वारणाली येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ३१ डिसेंबरपर्यंत पाणी देण्याचा निर्णय झाला नाही, तर थेट कोंबडवाडीत (जि. सातारा) पाणी उपसा केंद्रावर बेमुदत ठिय्या मांडू, असा इशारा देण्यात आला. त्याला उत्तर देताना टेंभूचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी निधी व मान्यता मागणीचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवले जातील, अशी लेखी हमी दिली. 

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चा सुरु झाला. सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह महिला, तरुण शेतकरी सहभागी झाले. ‘पाटबंधारे’समोर डॉ. पाटणकर व श्री. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘आटपाडीच्या पाणीप्रश्‍नी राजेंद्रअण्णा व आपण एकत्र आलोत. हा लढा अधिक ताकदीने व यश मिळेपर्यंत एकत्रच लढू. उरमोडी धरणातून पूर्ण क्षमतेने उपसून सातारा, खटाव, माण तालुक्‍यात पाणी दिले तरी निम्मे पाणी शिल्लक राहते. ते राजेवाडी तलाव आणि माण नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी सोडावे. त्याची पाणीपट्टी भरण्यास शेतकरी तयार आहेत. आटपाडीच्या पश्‍चिम भागात टेंभूचे पाणी आल्याने तेथील प्रश्‍न काही अंशी मार्गी लागले, मात्र पूर्व भागात संकट मोठे आहे. कोंबडवाडीत चार पंप सुरू आहेत, अन्य १२ पंप बसवले असले तरी त्याला वीज जोडलेले नाही. ती जोडली तर पाणी उपसा सहज शक्‍य होईल. वीज जोडून पाणी सुरु होईपर्यंत त्या ठिकाणी ठिय्या मांडू.’’ 

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘कोयनेत १०० टक्के पाणीसाठा असताना शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही, सरकारला जाग आणण्याची गरज आहे. इथल्या प्रतिनिधींनाही त्याशिवाय जाग येणार नाही. प्रशासनाला कृत्रिम टंचाई निर्माण करायची आहे का? पाण्याचे टॅंकर, चारा छावण्या खोलायच्या आहेत का, हेच कळेना. हे सरकार मागून काही देणार नाही, हिसकावून घ्यावे लागेल.’’

आनंदराव पाटील, जयराम निवासकर, दीपक देशमुख, विजय देशपांडे, श्रीरंग कदम, हणमंतराव देशमुख, ऋषिकेश देशमुख, सुमन देशमुख, हषवर्धन देशमुख, मच्छिंद्र खरात आदी सहभागी झाले. 

पाटबंधारेची ग्वाही
‘उरमोडी’चे पाणी माण नदीवरील बंधाऱ्यांत सोडण्यासाठी पंप कार्यान्वित करण्यासाठी आवश्‍यक निधीचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल. उरमोडीतून लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्यास सरकारची मान्यता मागणारा प्रस्ताव पाठवणे. टेंभूचे आवर्तन लवकर सुरू केले जाईल, शेतकरी पाणीपट्टी भरतील. टेंभूच्या आटपाडीतील कालव्यांवर गेट बसवण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही पाटबंधारे विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com