अखेर पाऱ्याने ओलांडले 41 अंश..!! 

अखेर पाऱ्याने ओलांडले 41 अंश..!! 

कोल्हापूर : गेले चार-पाच दिवस 38 ते 41 दरम्यान खाली-वर करणाऱ्या पाऱ्याने आज 42 अंशांवर उडी घेतली. परिणामी, पेटलेल्या अग्निकुंडासमोर उभे राहिल्यानंतर जशी शरीराला धग जाणवते, तशीच धग भरदुपारी जाणवली.

सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीचदरम्यान कोल्हापूरच्या तापमानवाढीचे सगळे नियम तोडत पारा 42 अंशांवर स्थिरावला. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावरील वाहतूकही मंदावली होती. दुपारी चारनंतर रस्त्यावर वर्दळ वाढली. 

पारा 36 अंशांच्या पलीकडे गेला तरी कोल्हापूरकरांना या तापमानाचे काही वाटत नाही. दहा वर्षांपूर्वी अशी स्थिती होती, की पारा 36 अंशांवर स्थिरावला तर कोल्हापुरात उन्हाळा तीव्र समजला जाई. मात्र, गेल्या दहा वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली. जागतिक तापमानवाढ, अल निनो, हरितगृह वायू परिणाम, वेस्टर्न डिस्टबर्न्स फॅक्‍टर, उत्तर भारतातून येणाऱ्या उष्णतेच्या लाटा हे शब्द आता निदान कोल्हापूरकरांसाठी तरी 'कॉमन' झाले आहेत. अलीकडच्या दोन वर्षांत तर दुपारी पारा सर्रास चाळिशी ओलांडत आहे. एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत तरी पारा 40, 41 अंशांवरच राहील. याबरोबर 10 मेपर्यंत तापमान 40, 41 पर्यंतच राहील, असा अंदाज ऍक्‍युवेदरने वर्तविला आहे. तापमानवाढीचा हा खेळ सुरू असला, तरी निदान यंदा चार वेळा वळवाचा पाऊस झाला. गत चार वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात वळवाचे प्रमाण घटले होते. उन्हाळ्यात फक्त एखादा वळवाचा शिडकावा होत असे. यंदा वळवाचा पाऊस झाल्याने वातावरण ढगाळ राहिल्याने उन्हाळ्याच्या तडक्‍यापासून अधूनमधून थोडा तरी दिलासा मिळाला. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा दुपारी उन्हाळा जाणवतो; तर रात्री अन्‌ सकाळी साधारण थंडी आणि धुके असते. अशा विचित्र वातावरणाचा अनुभवही यंदा प्रथमच कोल्हापूकरांनी घेतला. 

आज पाऱ्याने तर कमाल केली. पहाटे तीन ते सकाळी सातपर्यंत वातावरण थंड राहिले. साडेदहाला पारा 38 अंशांवर पोचला, तसे सूर्यकिरणांचा प्रभाव वाढू लागला. ऊन असह्य होऊ लागले. टोप्या, गॉगल घालूनच सकाळी अनेक जण कामासाठी बाहेर पडले. अकरा ते साडेअकरानंतर 38 अंशांवर स्थिरावलेला पारा हळूहळू 38, 39, चाळिशी ओलांडत 41 अंशांच्या दिशेने झेपावू लागला. अक्षरश: त्वचा भाजून काढण्याचा अनुभव कोल्हापूरकरांना आला. दुपारी कमाल तापमान 42 अंश, तर किमान तापमान 38 अंश झाले. पश्‍चिमेकडील क्षितिजावर ढगांचे आच्छादन 62 टक्के इतके होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 15 टक्के होते. दुपारी 41 अंशांच्या पलीकडे गेलेला हा पारा चारनंतर 35 अंशांवर आला. रात्री तर तापमान 25 अंशांवर स्थिर झाले. गार वारे सुटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com