खानापूर तालुका, विट्यात चोऱ्यांच्या प्रकारात वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

दागिने, रोख रकमेवर डल्ला : बंद घरे चोरट्यांच्या रडारवर 
विटा - खानापूर तालुका व विटा शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे बंद घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास करत आहेत.

दागिने, रोख रकमेवर डल्ला : बंद घरे चोरट्यांच्या रडारवर 
विटा - खानापूर तालुका व विटा शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे बंद घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास करत आहेत.

गेल्या महिन्यात साडेचार लाखांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. घरे हेरून चोरी करणारी एखादी  टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता नागरिक व्यक्त करत आहेत. अशा टोळीचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.   
     
तालुका व विटा शहरात गेल्या महिन्याभरात व चालू महिन्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत एकच असल्याचे केलेल्या चोरीवरून दिसून येत आहे. पाच व आठ मे रोजी बामणी व विटा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी ६८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. तर एप्रिल महिन्यात बलवडी (भाळवणी) येथील महावितरणच्या विद्युत ट्रान्स्फॉर्मरमधील चौदा हजार रुपये किमतीच्या  ताब्यांच्या तारांची चोरी केली. वलखड येथे बंद घर फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला. हणमंतनगर (विटा) येथे एक लाख ९९ हजारांच्या दागिन्यांची चोरी झाली. या चोऱ्याबरोबर विटा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करत आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हसवड बसमध्ये प्रवासी चढत असताना चोरट्यांनी एक एटीएम कार्ड व दोन मोबाईल चोरून नेले.

विटा येथे सोमवार व गुरुवारी आठवडा बाजार असतो. याठिकाणी कडेगाव, खानापूर तालुका व शहरातील लोकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत मिरज व अन्य ठिकाणाहून चोऱ्या करण्यासाठी चोरटे येत आहेत. आतापर्यंत या चोरट्यांनी लोकांचे महागडे मोबाइल चोरून नेले आहेत. पोलिसांत तक्रार केली तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो. तेथेही मोबाईल मिळेल, याची खात्री नसते. घरे बंद करून बाहेरगावी जाताना घरमालकांनी घराची जबाबदारी नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीवर सोपविली पाहिजे तरच या चोऱ्यांना आळा बसेल.