तर संभाजी भिडेंना अटक करा - रामदास आठवले

ramdas athavale
ramdas athavale

पंढरपूर - संभाजी भिडे यांनी नंदुरबार येथे बोलताना सर्वधर्मसमभाव वगैरे सर्व झूट आहे असे सांगत भारतीय संविधानाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. भारतीय संविधानाने जे सर्वधर्मसमभावाचे तत्व स्विकारलेले आहे त्याच्या विरोधात बोलण्याचा भिडे यांना अधिकार नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या भाषणाची सीडी पाहून त्यांना अटक करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत केली. आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सायंकाळी येथे आले, त्यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आठवले म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे यांचा संबंध असेल तर त्यांच्या विरुध्द कारवाई करावी अशी भूमिका आम्ही घेतली होती. त्यानंतर भिडे यांनी नंदुरबार येथे संविधान विरोधी भूमिका मांडलेली असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. 

भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढपुरात नुकताच धनगर मेळावा घेतला याचा अर्थ सर्व धनगर समाज त्यांच्या सोबत गेला असा होत नाही. गणपतराव देशमुख यांच्यामुळे तो मेळावा झाला. आंबेडकर हे पाहुणे म्हणून त्या मेळाव्याला आले असतील. आजही धनगर समाज मोठ्या प्रमाणात आमच्या सोबतच आहे असा दावा आठवले यांनी केला. 

अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या वेळी रिपब्लिकन एैक्‍याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना आंबेडकर यांनी "कोण आठवले मी विसरलो" असे उपरोधिक उत्तर दिले होते. त्या संदर्भात आज आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, आंबेडकर जरी मला ओळखत नसले तरी सगळा देश मला ओळखतो. ते मला ओळखत नसले तरी मी आंबेडकरांना ओळखतो. त्यांच्या शिवाय रिपब्लिकन ऐक्‍य होऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

शेतकरी संपाचा तिसरा दिवस आहे. सरकार कमी पडत आहे असे वाटते का या प्रश्‍नावर सरकार कमी पडत नाही. आंदोलनकर्ते कमी पडत आहेत असे मिष्कील उत्तर देत आठवले म्हणाले सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे. एकदम सगळ्या गोष्टी होणार नाहीत.

आपण भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याने चळवळीचे नेतृत्व दिसत नाही या प्रश्‍नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, माझी एक मांडी भाजपा सोबत आणि एक मांडी शिवसेनेसोबत आहे. दोघांच्या मध्ये मी बसलो आहे. मी कोणाबरोबर असलो तरी माझे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. 

पत्रकार परिषदेपूर्वी श्री.आठवले यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेईन समाज कल्याण विभाग तसेच ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेले गुन्हे या विषयीचा आढावा घेतला. देशपातळीवर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुढे केले जात आहे त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री.आठवले म्हणाले, पवार पुढे गेले तरी मी त्यांच्या मागे जाणार नाही. पवार हे चांगले मुरलेले राजकारणी आहेत. पवार साहेबांना पुढे केले तर राहुल गांधी मागे जातील. तिसऱ्या आघाडीची चर्चा आहे परंतु तिसऱ्या आघाडीला फार मोठे यश मिळेल अशी परिस्थिती नाही. भाजपाच्या विरोधात पक्ष एकत्र राहतील असे मला वाटत नाही. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. 2019 निवडणूकीत काही जागा कमी झाल्या तरी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com