अाठवड्यातील तीन दिवस तासगावातील एटीएम बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

तासगाव - तीन दिवसांपासून शहरातील बहुतांश बॅंकांची एटीएम बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. आठवड्यातून तीन दिवस सध्या एटीएम बंद अशी स्थिती महिनाभर आहे. त्याबद्दल तीव्र  प्रतिक्रिया उमटत आहेत. कॅशलेसकडे ग्राहक वळवण्यासाठी एटीएममध्ये पैसे कमी ठेवण्याची क्‍लृप्ती बॅंकांकडून वापरली जात आहे.

रविवार, सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस एटीएम बंद असल्याने एटीएमसमोर पुन्हा रांगा दिसू  लागल्या आहेत. काही बॅंकांतून पैसे काढण्यासाठीही ग्राहक गर्दी करताना दिसताहेत. सोमवारी काही काळ  सुरू असलेली एटीएम आज मंगळवारी पुन्हा बंद राहिल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. बॅंकांत  चौकशी केली असता वरून एटीएममध्ये कॅश कमी दिली जात असल्याचे सांगितले जाते. बॅंक अधिकाऱ्यांकडूनही एटीएममध्ये पैसे नसल्याबाबत वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. ग्राहक आणि बॅंक कर्मचाऱ्यांत भांडणाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. पैसे काढण्यासाठी बॅंकांत गर्दी होऊ लागली आहे. 

तासगावात बहुतांशी बॅंकांची एटीएम आहेत. शनिवारी सर्व बॅंका बंद होत्या. त्यादिवशी सायंकाळी आणि  रविवार सकाळपासूनच सर्व एटीएम वर ‘बंद’चे फलक लटकले. ज्या एटीएममध्ये पैसे आहेत तेथे गर्दी दिसली. काही एटीएममधून दोन हजार रुपयांच्या पटीत नोटा  मिळत होत्या. सोमवारी दुपारनंतर एटीएम सुरू झाली. मात्र मंगळवारी पुन्हा एटीएम बंद होऊ लागली. आठवड्यातून सरासरी दोन ते तीन दिवस सध्या एटीएम बंद असल्याचे चित्र एक महिन्यापासून दिसू लागले. शनिवार, रविवार सुटी आणि त्यानंतर एक दिवस असे एटीएम बंद राहू लागलीत. मात्र यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सुटीच्या दिवशी जास्त पैसे काढले जात असल्याने त्याच दिवशी एटीएममध्ये पैसे कमी पडतील, अशी नोट टंचाई निर्माण केली जाऊ लागल्याची स्थिती आहे. महिला, पेन्शनधारक, वृद्धांना सर्वाधिक त्रास होत आहे.