तीन पिढ्यांचा हौशी नाट्यजल्लोष...!

संभाजी गंडमाळे
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

राज्यात १९ केंद्रे - ८ हजारांवर कलाकार रंगमंचावर

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५६ व्या हौशी नाट्य स्पर्धेतून यंदा एकूण १९ केंद्रांवर आठ हजारांवर कलाकार-तंत्रज्ञ मंडळी रंगभूमीची सेवा करणार आहेत. 

राज्यातील सर्व केंद्रांच्या तुलनेत येथील केंद्रासह सांगली, कल्याण, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई केंद्रावर प्रत्येकी २० प्रयोग सादर होणार असून वीसहून कमी संस्था सहभाग असणाऱ्या केंद्रांची संख्या १३ आहे. 

राज्यात १९ केंद्रे - ८ हजारांवर कलाकार रंगमंचावर

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५६ व्या हौशी नाट्य स्पर्धेतून यंदा एकूण १९ केंद्रांवर आठ हजारांवर कलाकार-तंत्रज्ञ मंडळी रंगभूमीची सेवा करणार आहेत. 

राज्यातील सर्व केंद्रांच्या तुलनेत येथील केंद्रासह सांगली, कल्याण, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई केंद्रावर प्रत्येकी २० प्रयोग सादर होणार असून वीसहून कमी संस्था सहभाग असणाऱ्या केंद्रांची संख्या १३ आहे. 

दरम्यान, उद्या (ता. ७) पासून या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निमित्ताने राज्यभरात तीन पिढ्यांचा नाट्यजल्लोष अनुभवायला मिळणार आहे. त्यातील ३० टक्‍क्‍यांहून अधिक यंगस्टर्स मंडळी पहिल्यांदाच रंगमंचावर पदार्पण करणार आहेत. तांत्रिक बाजूही भक्कमपणे सांभाळणार आहेत.  येथील केंद्राचा विचार करता ज्या नाटकांतून कलेबरोबरच समाज प्रबोधनाचा जागर घडवायचा, त्याच नाटकांच्या स्पर्धेतही ‘ड्रामा फिक्‍सिंग’चा कटू अनुभव पचवून यंदा १५ वर्षे पूर्ण झाली. नाट्य प्रयोग सुरू असताना परीक्षकांनीच ‘डुलकी’ काढण्याचा प्रकारही येथेच दहा वर्षांपूर्वी घडला होता. त्यानंतर याच केंद्राला ऑनलाइन प्रवेशिकांचे ग्रहण लागले आणि केंद्राचा मुक्काम कधी सांगली, कधी कऱ्हाड, तर कधी रत्नागिरी असा फिरत्या रंगमंचासारखा राहिला. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर केंद्र पुन्हा सुरू झाले आणि राज्यात सर्वाधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभणारी स्पर्धा म्हणून येथील केंद्राचा आता लौकिक झाला आहे. 

यंदाही स्पर्धेसाठी संस्थांचा अपेक्षित सहभाग मिळाला असून काही अनुवादित नाटकांचे वेगळ्या धाटणीतले प्रयोगही अनुभवायला मिळणार आहेत. ग्रामीण भागातील नाट्य संस्थांचा यंदाच्या स्पर्धेत लक्षणीय सहभाग असून सीमा भागात मराठी नाटकांची परंपरा अधिक नेटाने पुढे नेणाऱ्या बेळगावच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या प्रयोगाने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे आणि बेळगावच्याच वरेरकर नाट्यसंघाच्या प्रयोगाने २९ नोव्हेंबरला स्पर्धेची सांगता होणार आहे. हौशी राज्य नाट्य स्पर्धेनंतर पाच डिसेंबरपासून राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ होईल तर जानेवारीमध्ये हिंदी, संगीत आणि संस्कृत भाषेतील नाटकांची स्पर्धा होईल. 

प्रेक्षकांना आवाहन
प्रत्येक प्रयोगासाठी प्रेक्षकांना पंधरा आणि दहा रुपये प्रवेशिका शुल्क आहे. एकूण जमा होणाऱ्या प्रवेशिका शुल्कातील पन्नास टक्के रक्कम ही संबंधित संस्थांना दिली जाते. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षक सहभागासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्पर्धा समन्वयक मिलिंद अष्टेकर यांनी केले आहे.  

सुभाष वोरांचा सन्मान
संगीत नाटकांच्या सुवर्णकाळात साधारपणे २५ वर्षांपूर्वी अधिकाधिक चांगली नाटके कोल्हापूरकरांना पाहायला मिळावीत, यासाठी येथील ज्येष्ठ नाट्य वितरक सुभाष वोरा सतत सक्रिय असायचे. जयराम शिलेदारांच्या ‘मराठी रंगभूमी’च्या संगीत नाटकांचे आठवडा-आठवडाभर प्रयोग त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात लावले. त्याशिवाय प्रभाकर पणशीकरांच्या ‘नाट्यसंपदा’ संस्थेच्या नाटकांचे प्रयोगही त्यांनी कोल्हापुरात आणले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने विशेष गौरव होणार आहे. तसेच केशवराव भोसले नाट्यगृहात व्यवस्थापक पदाची जबाबदारी इमानेइतबारे पार पाडणाऱ्या शेखर बोडके यांचाही स्पर्धेच्या वेळी विशेष गौरव होईल.

‘नेकी’ने प्रारंभ
बेळगाव नाट्य परिषद शाखेच्या ‘नेकी’ या नाटकाने उद्या (सोमवारी) स्पर्धेला प्रारंभ होईल. इरफान मुजावर यांचे लेखन तर विणा लोकूर यांचे दिग्दर्शन आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता प्रयोगाला प्रारंभ होईल.

Web Title: Three generations of amateur natyajallosh