चला जाऊ या पर्वतावर भटकायला!

परशुराम कोकणे
रविवार, 11 डिसेंबर 2016

गिर्यारोहण हा साहसी आणि आव्हानात्मक खेळ म्हणून ओळखला जातो. डोंगर, पर्वत, शिखरावर गिर्यारोहण करून एक वेगळी ऊर्जा मिळते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून गिर्यारोहण केल्याने जणू शरीराची आणि मनाची बॅटरीच चार्ज होते. आजच्या पर्वत दिनाच्या निमित्ताने आपण गिर्यारोहणाविषयी जाणून घेऊया.. 

गिर्यारोहण हा साहसी आणि आव्हानात्मक खेळ म्हणून ओळखला जातो. डोंगर, पर्वत, शिखरावर गिर्यारोहण करून एक वेगळी ऊर्जा मिळते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून गिर्यारोहण केल्याने जणू शरीराची आणि मनाची बॅटरीच चार्ज होते. आजच्या पर्वत दिनाच्या निमित्ताने आपण गिर्यारोहणाविषयी जाणून घेऊया.. 

डोंगररांगा, तेथील निसर्ग सर्वांनाच आकर्षित करतो. डोंगरांच्या अंगाखांद्यावर, कुशीमध्ये बागडण्यास आपण उत्सुक असतो. गिर्यारोहणासारखा साहसी खेळ यातूनच अस्तित्वात आला. इतर खेळांच्या तुलनेत गिर्यारोहण हा खेळ आव्हानात्मक आहे. इतर खेळ सपाट भागामध्ये, भव्य क्रीडांगणामध्ये, विद्युत रोषणाईच्या झोतामध्ये, भलेमोठे प्रायोजकत्व पत्करून होतात. पण गिर्यारोहणाचे उलटे आहे. जिथे कोणीच नसते अशा ठिकाणी आपल्याला जायचे असते. आपल्या महाराष्ट्राला भव्य अशी कणखर, राकट, निसर्गसंपन्न सह्याद्रीची पर्वतरांगा लाभली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजेच गुजरातपासून तमिळनाडू पर्यंत 1600 किमीची ही भव्य राग आपल्याला थक्क करते. सह्याद्रीच्या पर्वतरांगावर गिर्यारोहण करण्याचा आनंदच वेगळा आहे. 

गिर्यारोहणात सोलापूरकरांचा झेंडा 
सोलापूर जिल्ह्यातील अनेकजण गिर्यारोहणामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. सोलापूरचा पहिला एव्हरेस्टवीर डॉ. आनंद बनसोडे यांच्यानंतर आता अनेक तरुण गिर्यारोहणाकडे वळत आहेत. करण पंजाबी, निहाल बागवान, राजेंद्र डांगे, बालाजी जाधव यांच्यासह अनेक तरुण गिर्यारोहणासाठी जात आहेत. 

का साजरा केला जातो गिर्यारोहण दिन ? 
जागतिक स्तरावर 11 डिसेंबर हा दिवस पर्वत दिवस म्हणून साजरा केला जातो. याची अधिकृत घोषणा 2003 साली युनायटेड नेशन जनरल असेम्ब्लीने केली आहे. डोंगर, तेथील वातावरण आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक जनतेचे जीवन, संस्कृती प्रकाश झोतात यावी असा हा दिवस साजरा करण्याचा मागचा हेतू आहे.