नेते झाले एकत्र... कार्यकर्त्यांचे काय?

mayani
mayani

मायणी - (कै.) आमदार भाऊसाहेब गुदगेंचे चिरंजीव सचिन गुदगे हे एकेकाळच्या कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या तालमीत जोर-बैठका काढू लागलेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत ते आता "झाले गेले विसरून जाऊ'चा मंत्र जपू लागलेत. परिणामी छाती बडवून नेत्यांचे एकनिष्ठेचे पोवाडे गाणारे दोन्ही गटांतील कार्यकर्ते खासगीत मात्र नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यांच्या मनातील मळभ दूर करण्याचे आव्हान नेत्यांना पेलावे लागणार आहे.

भाऊसाहेब गुदगे यांच्या निधनानंतर लगेचच मायणी अर्बन बॅंक निवडणुकीच्या निमित्ताने गुदगे वाड्यातील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली. राजकीय महत्त्वाकांक्षेच्या सारीपाटात सुरेंद्र व सचिन हे सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झाले. बॅंक निवडणुकीत उमेदवारी अर्जच अवैध ठरून सचिन गुदगेंना पहिल्याच घासाला खडा लागला. त्यामुळे खचून न जाता "बचेंगे तो और भी लढेंगे' म्हणत त्यांनी आता जिल्हा परिषद निवणुकीसाठी दंड थोपटलेत. अर्थात त्यांच्यासमोर पुन्हा सुरेंद्र गुदगेंचे तगडे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी त्यांनी विविध पर्यायांची चाचपणी केली.

बॅंक निवडणुकीसाठी पडद्याआडून मदत करणाऱ्या डॉ. येळगावकरांचा आधार घेतल्याशिवाय लक्ष्य टप्प्यात येणार नसल्याने येळगावकरांनी दिलेला पहिला धडा गिरवत सचिन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येळगावकरांचे मायणी गटातील मावळे, सुरेंद्र गुदगेंचा तिरस्कार करणारे मूळच्या गुदगे गटातील काही कार्यकर्ते व सचिन यांचे शिलेदार अशी पलटण तयार झाली. कार्यकर्ते रिचार्ज व्हावेत, त्यांचा उत्साह वाढावा, राजकीय ताकद अजमावावी यासाठी गटातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. अत्यंत कमी वेळेत मेळाव्याचे नियोजन करावे लागले, हे खरे असले तरी गुदगे-येळगावकरांच्या एकत्र येण्याने अनेक जण नाराज असल्याचेही मेळाव्यावरून स्पष्ट झाले.

ज्यांच्यासाठी वाद झाले, तेच नेते आता तत्त्वे गुंडाळून व्यक्तिगत व राजकीय स्वार्थासाठी विरोधकांच्या गळ्यात गळे घालून गाणी गाऊ लागलेत, असा आरोप गुदगे व डॉ. येळगावकर समर्थक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अर्थात उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. खासगीत मात्र कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत. कोणीही कार्यकर्ते नाराज नाहीत, सगळे एकदिलाने कामाला लागले आहेत, अशी सारवासावर जाणकार कार्यकर्ते करीत आहेत.

नाराज कार्यकर्त्यांना आपले करण्याचा प्रयत्न

कोणत्या गटाचा झेंडा हाती घ्यायचा, या संभ्रमात कार्यकर्ते दिसतात. त्यातून अनेक कार्यकर्ते गुदगे व डॉ. येळगावकरांपासून दुरावण्याची शक्‍यता दिसते. युवक नेते सुरेंद्र गुदगे व कॉंग्रेसचे उमेदवार शंकर माळी यांनी अशा नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यापैकी किती मावळे कोणाच्या हाती लागतायत, त्यावर विजयाची नांदी ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com