कास पठारावर आजपासून पर्यटकांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

कास पठारावरून बोटिंगद्वारे बामणोलीला येणाऱ्या पर्यटकांना या जादा शुल्क वाढीमुळे त्रास होण्याची शक्‍यता आहे. वन विभागाने बामणोलीकडे येणाऱ्या पर्यटकांबाबत योग्य तो तोडगा काढून बामणोली बोट व्यवसायावर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

- राजेंद्र संकपाळ, सरपंच, बामणोली.

कास - जागतिक वारसा स्थळ व पुष्पपठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाचा प्रारंभ उद्या (बुधवारी) होणार आहे. 

 

दरम्यान, यावर्षी पठारावरील शुल्क चक्क दहा पटीने वाढवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पर्यटकांचा प्रतिसाद नेमका कसा मिळणार, याबाबत उत्सुकता असून वन व्यवस्थापन समितीला मात्र या वाढीव शुल्काच्या वसुलीवेळी पर्यटकांबरोबर होणाऱ्या कटकटीची चिंता वाटत आहे.

 

कासच्या शुल्क वाढीमध्ये १२ वर्षांवरील व्यक्तीला शनिवार, रविवार व इतर शासकीय सुटीदिवशी शंभर रुपये तसेच इतरवेळी ५० रुपये शुल्क ठरले आहे. तर वाहनांना पार्किंगसाठी दुचाकी दहा, चारचाकी ५० रुपये, तर मिनीबससह मोठ्या वाहनांना १०० रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे. कॅमेऱ्यासाठी तीन तासांसाठी १०० रुपये तर गाइड हवा असल्यास तासाला १०० रुपये आकारण्यात येणार आहेत. या शुल्क वाढीसंदर्भात वन विभागाने चार गावांच्या असणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला विश्वासात घेतले नसल्याची ओरड आता होवू लागलेली आहे. काही ग्रामस्थांनी खासगीत बोलताना ही शुल्क वाढ म्हणजे तंट्याला निमंत्रण आहे असे सांगितले.  

 

कास पठाराकडे जूनपासूनच पर्यटकांचा राबता सुरू झाला आहे. यातही जून, जुलैमध्ये पठारावर फुले नसल्यामुळे पर्यटक देशातील उंच धबधबा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वजराई धबधब्याला भेट देण्यासाठी रीघ लावत आहेत. 

 

पण, याठिकाणीही आता धबधबा कोणाचा यावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे धबधबा नेमका कोठून पाहायचा? यावरूनही खेचाखेची सुरू आहे. कास पठार व परिसरातील ही निसर्गसंपदा पैसे करून देत असल्यामुळे तिच्या श्रेयवादावरून व मालकीवरूनही वाद रंगत आहेत. त्यातही समाधानाची गोष्ट म्हणजे सातारा तालुका व मेढा पोलिसांनी यावर्षी दर आठवड्याला चांगला बंदोबस्त ठेवून हुल्लडबाजांवर व बेशिस्त वाहनचालंकावर कारवाई करून हा परिसर शांत राहील, याची दक्षता घेतली आहे. मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांनी दर शनिवारी व रविवारी स्वतः गस्त घालत या परिसरातील बेशिस्तीला आळा घालण्यात पुढाकार घेतला आहे. कासवर फुलांचा गालिचा फुलायला अद्याप अवकाश असला तरी शुल्क वसुलीच्या प्रारंभामुळे हंगामाची अधिकृत सुरवात होणार असून वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीची परीक्षा सुरू झाली आहे.