नाटकवाल्यांनी कमावलं, पण रसिकांच्या हौसेला गमावलं 

नाटकवाल्यांनी कमावलं, पण रसिकांच्या हौसेला गमावलं 

कोल्हापूर - कोल्हापूरात सुसज्य नाट्यगृह आहे, सुट्टीचा हंगाम सुरू आहे, पर्यटकांचा ओघ वाढला आहे. महिनाअखेर संपली आहे. बाजारपेठेत पैशांची रेलचेल आहे. तरीही सुट्टीचा आनंद घेत नाटक पहाण्याची हौस येथे पूर्ण होणे मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे स्थानिक रसिकांपासून घरगुती पाहुण्यांपर्यंत सर्वांची कुंचबना होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने व्यवसायिक नाटकांवर 25 लाखांच्या बक्षीसांची खैरात केली. नाट्य संमेलनाला निधी दिला. यातून व्यवसायिक नाटक जगविण्याचा प्रयत्न जरूर केला; मात्र नाटकवाल्यांनी नाट्य निधीचा लाभ उकळला. पण, नाटकांचा आनंद देण्यात हात आखडात घेतला आहे. 

मराठी नाटकांची परंपरा समृध्द करण्यात कोल्हापूरचा मोठा वाटा आहे. येथील रसिकांच्या उदंड प्रतिसादावर अनेक नाटक आजरामर झाली. काही नाटक 10 ते 40 वर्षे येथे सादर होत राहिली. यातील अपवाद वगळता सर्व नाटकातील अभिनेते - अभिनेत्री मराठी चित्रपटातील आघाडीचे नायक नयिका म्हणून लौकीकप्राप्त बनले. 

रसिक आपला आवडता अभिनेता - अभिनेत्रीला पडद्यावर पहातात जितकी दाद देतात त्यातून अधिक दाद त्यांना रंगमचावरील अभियनास मिळते. त्यामुळे नाटकांना प्रतिसाद मिळतो. रसिकांची ही गरज ओळखून अनेक कलावंत चित्रपटाबरोबर नाटकाचा दौराही करत. त्यामुळे नाटकाबरोबर चित्रपटांचाही प्रेक्षक वाढला. त्यातून नाटक व चित्रपटांचा गल्ला वाढला. अनेक कलावंत एकाच वेळी चित्रीकरण व नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने येथे तळ ठोकून असतात. 

अलीकडे वाहिन्यांवर मालिकांचा ट्रेंड वाढल्याने कलावंतांना मुंबईत काम, गल्ले लठ्ठ मानधन मिळते. मुंबई व परिसरातच मालिकांच्या चित्रीकरणाला प्राधान्य व नाटकाला दुय्यम स्थान मिळाले. त्यामुळे काही व्यवसायिक नाटक मुंबई, ठाणे, डोंबीवली, पनवेल फार तर पुणे या भागापूरतीच होतात. त्यातले एखादे नाटक फार प्रयत्नपूर्वक कोल्हापूरात आणावे लागते. त्याचे भाडेही दिड दोन लाखाच्या पुढे जाते. एक नाटक सादर करून कलावंत मुंबईकडे परततात. 

त्यामुळे पूर्वी एखाद्या नाटकांचा दौरा कोल्हापूरात आला की, इचलकरंजी, सांगली, कराड, रत्नागिरी असा आठ दहा प्रयोगांचा दौरा करून परतायचे, असा प्रकार बंद झाला. 

त्यामुळे बहुतेक कलावतांच्या अभिनयाचा करिष्मा रसिकांना छोट्या पडद्यावर पाहून समाधान मिळवावे लागते. अशात महाराष्ट्राची नाट्य परंपरा अधिक समृध्द करण्यासाठी संस्कृतीक कार्य संचनालय दरवर्षी नाट्यस्पर्धा घेते. यातील विजेत्या नाटकाला दिड लाखांपासून वैयक्तीक स्तरावर 30 हजार रूपयांचे बक्षीस देते. या बक्षीस समारंभावर जवळपास 25 लाखांचा खर्च होतो. या शिवाय दरवर्षी होणाऱ्या नाट्यसंमेलनाला 25 ते 50 लाखाचा निधी देण्यात येतो. यातील बहुतांशी पैसा व्यवसायिक नाटकांतील कलावंतांनी बक्षीसाच्या रूपात मिळवला आहे. कलावंतांचे नाटक मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील किती रसिकांना पहाता आले याचे उत्तर निराशाजनक आहे. 

उर्वरीत महाराष्ट्राने का करावे कौतुक? 
कलावंताना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम सर्व महाराष्ट्रातील लोकांच्या करातून दिली गेली. जे कलावंत आपल्या स्वार्थापोटी महाराष्ट्रभर नाटकांचा दौरा करणे टाळतात ते फक्त टिव्हीवर झळकून भरगच्च मानधन उकळतात. त्याच बरोबर मुंबईत पुण्यात नाटकाचे प्रयोग करून महाराष्ट्रात नाटक गाजविले अशा आर्विभावात बक्षिसाची रक्कम मिळवतात. त्यासोबत नाटकांचे मानधन हक्काने घेतात. असा तिहेरी लाभ उकळण्यात गुंतलेल्या कलावंताचे कौतुक उर्वरीत महाराष्ट्रातील नाट्यरसिकांनी का करावे असा प्रश्‍न या निमित्ताने ठळक झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com