सिव्हिल चौकात वाहतुकीची कोंडी 

सिव्हिल चौकात वाहतुकीची कोंडी 

सांगली - सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्ता चहाच्या टपऱ्या, विक्रेते आणि रस्त्यावरील पार्किंगमुळे कोंडीत सापडला आहे. खासगी रुग्णवाहिकांना जागाच नाही. रिक्षा थांब्याचीही अवस्था तीच असल्यामुळे फूटपाथवर रिक्षा लागतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. सिव्हिल चौक आणि हॉस्पिटलसमोरील रहदारीची कोंडी फोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जाते. 

सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे मोठे केंद्र आहे. जिल्ह्यातील जतपासून पश्‍चिमेचे शेवटचे टोक चांदोलीपर्यंतचे रुग्ण येथेच येतात. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, इचलकरंजी तसेच कर्नाटकातील, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून देखील रुग्ण येतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज शेकडो रुग्ण आणि नातेवाईक यांची ये-जा सुरूच असते. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल चौक नेहमी गजबजलेलाच असतो. 

सिव्हिल चौक आणि समोरील रस्ता गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीच्या कोंडीत सापडला आहे. हॉस्पिटलसमोरच 10 ते 12 रुग्णवाहिका रस्त्यावर थांबलेल्या असतात. रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून खासगी रुग्णवाहिकांसाठी सिव्हिलमधील शवविच्छेदन विभागाजवळ पार्किंगची सोय केली होती. परंतु आतमध्ये रुग्ण आणि नातेवाइकांना येण्यात अडचण होते. त्यामुळे सदरची जागा बदलून मिळावी अशी मागणी अधिष्ठातांकडे यापूर्वी केली आहे. त्यावर चर्चा होऊन अद्याप निर्णय झाला नाही. खासगी रुग्णवाहिकांना सिव्हिलच्या परिसरात पार्किंगची जागा बदलून दिल्यास ही रहदारी कमी होईल. सिव्हिलसमोर मेडिकल, खासगी हॉस्पिटलमध्ये येणारी वाहने रस्त्यावर पार्किंग केली जातात. हातगाडे, चहाच्या टपऱ्या, विक्रेते यांचे अतिक्रमणही कायमच आहे. संरक्षक भिंतीलगतची दुकाने व त्यासमोरील वाहने यामुळे कोंडीत भरच पडते. हॉस्पिटलसमोरील फूटपाथवर रिक्षा थांबा अनेक वर्षांपासून सुरू आहे. सिव्हिलच्या विस्तारीकरणात संरक्षण भिंत आतमध्ये घेऊन रिक्षा थांब्याला जागा देण्याचा प्रश्‍न प्रलंबित आहे. 

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णवाहिकांना शवविच्छेदन विभागाजवळ पार्किंगसाठी जागा दिली होती. परंतु आतमध्ये रुग्ण येत नसल्यामुळे दुसऱ्या जागेची मागणी अधिष्ठांताकडे केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. लवकरच आमदार सुधीर गाडगीळ व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना भेटून निवेदन दिले जाईल. 

विलास अब्दागिरे (अध्यक्ष, रुग्णवाहिका चालक मालक संघटना) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com