सुट्या पैशासाठी 'ग्राहक देवो भवः'

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

सोलापूरच्या आठवडी बाजारातील व्यवहार ठप्प; विक्रेते चिंतेत
सोलापूर - दोन हजार रुपयांच्या करकरीत नोटा ग्राहक आणि विक्रेता दोघांकडेही आहेत. दोघांकडेही पैशाचा तुटवडा नाही, तरीही हे दोघेही समाधानी नाहीत. कारण सुट्या पैशांअभावी विक्रेत्याला माल विकता येईना व ग्राहकाला खरेदी करता येईना, त्यामुळे "नोटा हाताशी अन्‌ ग्राहक आणि विक्रेते दोघेही उपाशी, अशी स्थिती सोलापूरमध्ये मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा परिणाम या बाजारावरही झाल्याचे दिसून आले.

सोलापूरचा मंगळवार बाजार म्हटले, की सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत गजबजलेला परिसर असा अनुभव आहे. मात्र या वर्षी सुरवातीला दुष्काळामुळे चित्र पालटले होते. या कालावधीत विक्रेते जास्त आणि ग्राहक कमी असे दृश्‍य होते. आता "नोटाबंदी'मुळे ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या मोठी असली तरी सुट्या पैशाअभावी व्यवहारच होत नाहीत. सुटे पैसे घेऊन येणाऱ्या ग्राहकांची "देवा'सारखी वाट पाहणाऱ्या विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. व्यवहारच होत नसल्याने छोटे व्यावसायिक कर्जबाजारी होऊ लागले आहेत.

सोलापूरच्या आठवडी बाजाराला सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, तुळजापूर तालुक्‍यातील तामलवाडी, खडकी या परिसरांतील नागरिकांची या बाजारात रेलचेल असते. आज बाजार नेहमीप्रमाणे भरला, मात्र व्यवहार मात्र नेहमीप्रमाणे सकाळी सुरू झाले नाहीत. किमान वाहतुकीचा तरी खर्च निघावा, अशी विक्रेत्यांची अपेक्षा आहे. मात्र, नोटाबंदीमुळे सुट्या पैशांअभवी खरेदी- विक्री होत नसल्याने तितकेही उत्पन्न मिळत नसल्याचा अनुभव आहे. या बाजारात मच्छी मार्केट, पालेभाजी, भुसार आणि जुना बाजार असे विभाग आहेत. प्रत्येक विभागातील विक्रेते ग्राहकांची वाट पाहत बसल्याचे दिसत होते.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी चांगला निर्णय घेतला आहे. मात्र आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून सुटे पैसे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले, तर आमची चूल पेटेल.
- नजीर बेलिफ, विक्रेता