पसंतीनुसार पोलिसांना बदलीची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

कोल्हापूर - कोणत्या ठिकाणी बदली हवी आहे,जागा शिल्लक आहे, चला केली तुमची त्या ठिकाणी बदली,अशा पोलिसांच्या पसंतीस अग्रक्रम आणि पारदर्शक पद्धतीची बदली प्रक्रिया आज अलंकार हॉल येथे झाली. वरिष्ठांकडून आत्मियतेने पसंतीचा विचार होत असल्याने प्रक्रियेत सहभागी झालेल्या २६५ पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पहावयास मिळत होते. 

कोल्हापूर - कोणत्या ठिकाणी बदली हवी आहे,जागा शिल्लक आहे, चला केली तुमची त्या ठिकाणी बदली,अशा पोलिसांच्या पसंतीस अग्रक्रम आणि पारदर्शक पद्धतीची बदली प्रक्रिया आज अलंकार हॉल येथे झाली. वरिष्ठांकडून आत्मियतेने पसंतीचा विचार होत असल्याने प्रक्रियेत सहभागी झालेल्या २६५ पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पहावयास मिळत होते. 

जिल्ह्यात एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षे सेवा बजावलेल्या २६५ पोलिस कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. त्याची प्रक्रिया आज पोलिस ग्राऊंड येथील अलंकार हॉलमध्ये झाली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी याची सुरवात झाली. हॉलमध्ये बदलीसाठी पोलिस कर्मचारी गणवेशात उपस्थित होते. सुरवातीला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अपेक्षित ठिकाणी बदली होईल की नाही,याची रुखरुख दिसत होती. व्यासपीठावर मोठी स्क्रिन लावण्यात आली होती.तेथे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील रिक्त जागेसंबधीची सविस्तर माहिती होती.एक एक पोलिस कर्मचाऱ्यांना व्यासपीठावर बोलवले जात होते. सध्या कोठे आणि किती वर्षे कार्यरत आहात? हे जाणून घेऊन कोणत्या ठिकाणी बदलीची अपेक्षा आहे, हे  विचारले जात होते. बदली मागितलेल्या पोलिस ठाण्यात जागा शिल्लक असेल तर तातडीने त्यांची त्या जागी बदली केली जात होती. मात्र एखाद्या पोलिस ठाण्यात जागा शिल्लक नसेल, तर कर्मचाऱ्याने पसंती दर्शविलेल्या इतर पोलिस ठाण्याची स्क्रिनवर यादी झळकली जात होती. त्यानुसार रिक्त असलेल्या ठिकाणी तातडीने कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक मोहिते देत होते. 

तत्कालिन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पसंतीला प्राधान्य देत बदलीची प्रक्रिया प्रथम जिल्ह्यात सुरू केली. त्यात आज अखेर खंड पडला नाही. साहेबांनी आपले मत आपली पसंती विचारून अपेक्षित ठिकाणी बदली केली असल्याची चर्चा अलंकार हॉल बाहेर पोलिस कर्मचाऱ्यांत सुरू होती.यावेळी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव आदी उपस्थित होते.  

कर्मचाऱ्यांनी घेतली गळाभेट
 बदलीमुळे पोलिस ठाणी बदलणार, आता दररोजची भेट होणार नसल्याने बदली झालेले पोलिस कर्मचारी एकमेकांची गळाभेट घेताना दिसत होते. पोलिसांना जागेवरच बदलीच्या ठिकाणी नियुक्त केल्याचे सांगितले असले तरी त्याची अधिकृत यादी उद्या (ता.१७) जाहीर केली जाणार आहे.