हळद दर 300 रुपयांनी घसरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

जीएसटीचा झटका - बेदाणा बाजारावर चिंतेचे सावट 

सांगली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होणार हे निश्‍चित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आज हळद दरात क्विंटलमागे 300 रुपयांनी घसरण झाली. वसंतदादा मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी बाजारातून काढता पाय घेतल्याने मोजकेच सौदे होवू शकले. बेदाणा दरात गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली असताना आता कराचा बोझा आल्याने चिंतेचे सावट आहे. 

केंद्र सरकारने काही शेतमालाला करातून वगळले असले तरी बेदाण्यावर 12 टक्के आणि हळदीवर 5 टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहेच, शिवाय करप्रणालीमुळे आता हिशोब ठेवण्याची नव्याने तसदी घ्यावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे सावट दाटले आहे. हा कर कसा आकारला जाणार, त्याचे टप्पे काय, याविषयी संभ्रम असल्याने आज खरेदीदारांनी सौद्याकडे पाठ फिरवल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी सभापती गोपाळ मर्दा यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सांगली बाजार समितीत प्रतीवर्षी 1350 कोटींचे बेदाणा आणि हळदीचा व्यापार होतो. केंद्राकडून जीएसटीची अंमलबजावणी 1 जुलैपासून प्रस्तावित आहे. प्रारंभी बेदाणा हा शेतमाल प्रक्रिया केलेले उत्पादन म्हणून गणला जात होता, परिणामी त्यावर कर आकारणी व्हायची. आघाडी सरकारने ती मागे घेत सूट दिली होती. गेल्या पाच वर्षांपासून बेदाण्याला व्हॅटमुक्त होता. आता थेट 12 टक्के कर लागणार असल्याने दुष्काळात धोंडा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

हळद स्थिती अशी -
* आवक - स्थानिक - 10 लाख पोती 
* परपेठ - 3.5 लाख पोती 
* दर (क्विंटल)- सरासरी - 7000 रुपये 
* राजापुरी - 9200 ते 9500 
* राजापुरी मध्यम - 7500 ते 7700 
* पावडर क्वालिटी - 6800 ते 7200 
* देशी कडप्पा - 5700 ते 5800 
* शिल्लक हळद - बाजारात - 1 लाख पोती 
* शेतकऱ्यांकडे शिल्लक - 1 लाख पोती 

'केंद्राने बेदाणा, हळदीला जीएसटीतून वगळावे. जीएसटी कमी करण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांनी एकत्र येवून केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेवू.'' 
- प्रशांत शेजाळ, सभापती, सांगली बाजार समिती. 

'हळद, बेदाण्यावर जीएसटी लागू केल्याने बाजारपेठेसह शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. हळद ही औषधी वस्तू आहे, तिचा थेट आरोग्याशी निगडीत संबंध आहे. ती करमुक्त असली पाहिजे.'' 

- गोपाळ मर्दा, चेंबरचे माजी अध्यक्ष, हळद व्यापारी

Web Title: turmeric rate 300 rs. decrease