थेट पाईपलाईन योजनेवर दोन माजी मंत्र्यांचा दरोडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

कोल्हापूर - ""थेट पाईपलाईन योजनेच्या निधीवर दोन माजी मंत्री, ठेकेदार कंपनी आणि सल्लागार कंपनीने संगनमताने दरोडा टाकला आहे. यामध्ये सुमारे 60 कोटी रुपयांचा ढपला पाडला असून त्यांची नार्को टेस्ट करा,'' अशी मागणी भाजप-ताराराणी आघाडीच्यावतीने पत्रकार परिषदेत महापालिकेतील गटनेते सत्यजित कदम, सुनील कदम यांनी केली. "लोखंडी ब्रिजच्या 20 लाख रुपयांच्या कामाचे 2 कोटी 48 लाख रुपयांचे बिल लावण्याच्या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी व तातडीने बिल वसूल करावे,' अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेते विजय सूर्यवंशी उपस्थित होते. 

सत्यजित कदम म्हणाले, ""दोन माजी मंत्र्यांवर महापालिकेत येऊन आढावा बैठक घेण्याची वेळ आली आहे. तीन वर्षांत यांना कधीही आढावा बैठक घेण्याचे सुचले नाही. आमच्यावर योजनेत खो घातल्याचा आरोप करताना त्यांनी तारतम्य बाळगायला हवे होते. पुलाच्या कामात जी जादाची बिले सादर झाली. ती आम्ही उजेडात आणली तर आम्ही खो घातला, असे कसे म्हणता येईल? झालेल्या चुका त्यांनीही मान्य केल्या आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे जागरूक नगरसेवक यापुढेही या योजनेतील त्रुटी दाखवतच राहणार आहेत. योजना लवकरात लवकर पूर्ण होताना ती परिपूर्ण आणि पारदर्शकपणे पूर्ण व्हावी, यासाठी आमचा आग्रह असेल. झालेल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठीच हे दोन माजी मंत्री महापालिकेत आढावा बैठकीसाठी आले.'' 

सुनील कदम म्हणाले, ""थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनीच योजनेवर दरोडा घातला आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी या योजनेतील गैरव्यवहार बाहेर काढला. त्यामुळे त्यांना या बैठकीसाठीच बोलाविले नाही; पण आम्ही गप्प बसणार नाही. या योजनेची सीआयडी चौकशी व्हावी, ही तर आमची मागणी आहेच; पण योजनेच्या 18 ते 20 लाखांच्या कामाचे 2 कोटी 48 लाखांचे बिल लावण्याच्या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी करावी. दिलेले बिल तातडीने वसूल करावे, अशी आमची मागणी आहे. या दोन माजी मंत्र्यांच्या कृपेने वर्षभर एक बोगस महापौरपदावर बसल्या. त्यानंतर आताच्या महापौरांनी बजेट मंजूर होऊन दोन महिने होत आले तरीदेखील त्यावर सही केलेली नाही. महापालिकेचा हा कसला कारभार आहे?'' असा सवालही त्यांनी केला. या वेळी राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, ईश्‍वर परमार, किरण नकाते, राजाराम गायकवाड, आशीष ढवळे, विजय खाडे आदी उपस्थित होते. 

विशेष सभेची मागणी 
थेट पाईपलाईन योजनेच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची विशेष सभा ठेकेदार व सल्लागार कंपनीच्या उपस्थितीत घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेता विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम यांनी दिले.