मंगळवेढा पोलिस ठाण्यातून दोन पिस्तूले गायब 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 11 मे 2017

पिस्तूल गायब झालेल्या घटनेची चौकशी सुरु असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे दिला जाईल. त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई होईल. 
- रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा

मंगळवेढा : मंगळवेढा पोलिस ठाण्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी तालुक्‍यातील परवानाधारकांची शस्त्रे जमा करुन घेतली होती. याच शस्त्रातील सुमारे दोन लाख रुपये किंमतीची दोन पिस्तुले गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्या. या निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलिसांनी परवानाधारक व्यक्तींकडील शस्त्रे जमा करुन घेतली होती. मरवडे येथील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी व खुपसंगी येथील एका शेतकऱ्याने त्यांचे परवानाधारक पिस्तूल मंगळवेढा पोलीस ठाण्यात जमा केले होते. या दोन्ही पिस्तूलांची मिळून किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात आहे. 

जमा केलेल्या सर्व शस्त्रांची रेकॉर्डला नोंद करुन ती कारागृहातील स्टोअर रूममध्ये ठेवली होती. या ठिकाणी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा असतो. असे असताना या दोन पिस्तूलांना पाय कसे फुटले, याबाबत नागरिकांमधून अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. निवडणुका होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. अन्य शस्त्रधारकांना शस्त्रे परत केली. वरील दोघांनी पिस्तुलांबाबत स्थानिक अधिकाऱ्याकडे मागणी केली. येथे न्याय मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना भेटून पोलिसांच्या कारभाराचा पाढा वाचून गायब झालेल्या त्या शस्त्रांची मागणी केली. त्यानंतर मंगळवेढ्याचे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलीस अधिक्षकांनी या घटनेची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. 

लक्ष्मी दहिवडी खून प्रकरणाचा तपास व्यवस्थित न केल्यामुळे मागील आठवड्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके यांचे निलंबन झाले. ही घटना ताजी असतानाच पिस्तुल चोरीचे प्रकरण घडल्यामुळे आता कोणावर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.