यू ट्यूब, ॲनिमेशनद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

ज्ञानसंपदा शाळेचा उपक्रम; स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी, हरित सेनेकडून वृक्षलागवड
सोलापूर - संगणक युगाच्या काळात मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न ज्ञानसंपदा शाळेत करण्यात येत आहे. यू ट्यूबवर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक तसेच ॲनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

ज्ञानसंपदा शाळेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. प्रत्येक वर्षी नवे उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न शाळेकडून केला जातो. मुलांना पुस्तकी भाषेपेक्षा ऑडिओ व व्हिडिओच्या माध्यमातून शिकविल्यास लवकर समजते, हे ओळखून मुख्याध्यापक सिद्धारूढ बेडगनूर यांच्या पुढाकाराने करमणूक व संगणकाच्या वापरातून मुलांना शिक्षण दिले जात आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय शिक्षणापासूनच करावी, या उद्देशाने शाळेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान यांचे विशेष वर्ग चालविले जात आहेत. एमटीएस, एनटीएस, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले जाते. यात भोंडला, आषाढी एकादशी दिंडी आदी उपक्रम घेतले जातात. यंदाच्या वर्षी सांस्कृतिक व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन शाळेमध्ये भरविण्यात येणार आहे.

शाळेच्या परिसरात हरित सेनेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. अडुळसा, बेहडा, कडुनिंब, आवळा, गवती चहा या वनस्पतींचे चांगल्या पद्धतीने संवर्धन केले जात आहे. साने गुरुजी कथामालेअंतर्गत विद्यार्थ्यांवर विशेष संस्कार केले जात आहेत. त्यासोबतच विद्या विकास मंडळातर्फे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन केले जाते. परीक्षेच्या काळात चांगली तयारी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेतला जातो.