उदयनराजेंना अटकपूर्व जामीन नाकारला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सातारा - लोणंद औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकास खंडणीसाठी मारहाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळला. या गुन्ह्यात अटक केलेल्या नऊ जणांनाही न्यायालयाने जामीन नाकारला. 

सातारा - लोणंद औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकास खंडणीसाठी मारहाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळला. या गुन्ह्यात अटक केलेल्या नऊ जणांनाही न्यायालयाने जामीन नाकारला. 

लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलाइज या कंपनीच्या मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, खासदार भोसले यांच्यासह अन्य संशयितांवर खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्यात शहर पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. त्यातील आठ जण न्यायालयीन कोठडीत आहेत, तर अन्य दोघे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तसेच खासदार भोसले यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. अंतिम निर्णयासाठी 31 मार्च, तसेच सहा व दहा एप्रिल रोजी सुनावणी झाली. काल दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. न्यायालयाने निर्णयासाठी आजची तारीख दिली होती. निर्णय होणार असल्याने आज न्यायालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. दुपारी न्यायाधीश शिरसीकर यांनी खासदार भोसले यांचा अटकपूर्व, तर इतर संशयितांचा जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला. 

गुन्ह्याचा तपास अपूर्ण आहे. फिर्यादीतील म्हणण्यानुसार सकृतदर्शनी पुरावे आहेत. फिर्यादीला घटनास्थळी नेल्याचे-बाहेर आणल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. पुरवणी जबाबात फिर्यादीने सांगितल्यानुसार, त्यांनी दर महिन्याला दोन लाख रुपये याप्रमाणे बारा महिने रक्कम संबंधितांना पोच केली आहे. त्या पैशाची वसुली करायची आहे. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या अन्य संशयितांना अटक करायची आहे, असा युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला होता, असे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी व सहायक सरकारी वकील नितीन मुके यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगितले. निकालपत्र मिळाल्यानंतर नेमके कोणते मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले आहेत, हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. 

निर्णयावर अपील करणार - मणेर 
न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे पोलिस संशयितांना केव्हाही अटक करू शकतात, असे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले, तर निकालपत्राची प्रत मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचे ऍड. ताहीर मणेर यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण... 

लोणंद औद्योगिक वसाहतीमध्ये सोना अलाइज कंपनी आहे. या कंपनीचे मालक राजकुमार जैन यांनी 23 मार्चला सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य संशयितांनी 18 मार्च रोजी खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. पुरवणी जबाबामध्ये त्यांनी संबंधितांना महिन्याला दोन लाख याप्रमाणे 24 लाख रुपये आतापर्यंत दिल्याचे म्हटले आहे. याउलट गेल्या तीन महिन्यांपासून कंपनी बंद करण्यात आली आहे. 1300 कामगारांवर अन्याय झाला आहे. त्यांचा संघर्ष चालू होता. कामगारांची देणी भागवा, असे खासदार भोसले म्हणाले व त्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याने पोलिसांना हाताशी धरून हा गुन्हा दाखल केला असल्याचे म्हणणे खासदार भोसले यांच्या वतीने मांडण्यात येत आहे. 

Web Title: Udayanraje denied bail