मुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे

मुख्यमंत्र्यांसह सरकारला हद्दपार करा : उमा पानसरे

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार पाठीशी घालत आहे. सरकारकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. त्यांना विचारवंत नको, तर साधू-संत हवे आहेत. त्यामुळे भाजप सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हद्दपार करावे, असे आवाहन गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी काल येथे केले. अत्याचार, महागाई, गरिबांचे शोषण तसेच इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा धडक मोर्चा काल काढण्यात आला. 

गरीब, कष्टकऱ्यांपर्यंत सर्वांनाच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पेट्रोल-डिझेल दरात प्रचंड वाढ झाली आहे. लहान मुली व महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे हजारोंचा मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. 

भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा लता भिसे म्हणाल्या, ''महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. असिफा हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.'' जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ''जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू आहेत. पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे धंदे पोलिसांच्या संगनमताने सुरू आहेत.'' नामदेव गावडे म्हणाले, ''मन में है विश्‍वास, असे म्हणणाऱ्यांवर आता लोकांचा विश्‍वास राहिलेला नाही. उच्च न्यायालयात एसआयटी व सीबीआयने स्टेटमेंट दिले आहे, ते खेदजनक आहे. हे सरकार कष्टकऱ्यांच्या विरोधातील आहे. सरकारला जागा दाखवून द्यावी.'' 

दरम्यान निवेदनात म्हटले आहे की, भाजप सरकारच्या कारकिर्दीत बलात्कार, अत्याचार, खून, दरोडे, मारामारी वाढली आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर व प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना अद्यापही शिक्षा झालेली नाही. रेशनवरील धान्य व इतर वस्तूंचा अभाव, न्यायव्यस्थेत हस्तक्षेप केला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळत नाही. विचारवंतांच्या हत्येची तपासणी करणाऱ्यांवर सरकार दबाव टाकून आरोपींना सोडून देत आहे. याचा निषेध करत या तिन्ही नेत्यांच्या मारणाऱ्यांना दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणीही केली. रेशनवरील धान्य पूर्ववत 35 किलो करावे, बायोमेट्रिक पद्धतीमुळे धान्य नाकारले जात आहे. बायोमेट्रिक पद्धत बंद करावी, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव मिळावा, महिला बचत गट, मायक्रोफायनान्सची कर्जे माफ करावीत, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्षांनंतर महिन्याला पेन्शन द्यावी तसेच धामणी प्रकल्पाचे काम तातडीने करावे, अशीही मागण्या करण्यात आल्या. 

अंगणवाडी, ग्रामपंचायत कामगार, आशा परिचर, असंघटित कामगारांना 18 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे, शिक्षणाचे खासगीकरण व धार्मिकीकरण रद्द करून 1314 शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा, सरकारी विभागातील 1 लाख 77 हजार पदे त्वरित भरावीत, महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्यावरील वाढते अत्याचार पूर्णपणे थांबवावेत, अशाही मागण्या केल्या आहेत. यावेळी प्रवीण मस्तूद, रमेश सहस्त्रबुद्धे, शाम चिंचणे, अरविंद जक्का, दिनकर सूर्यवंशी, शिवाजी तळेकर, भारती चव्हाण, शुभांगी पाटील, स्नेहल कांबळे, दत्ता मोरे आदी उपस्थित होते. 

गोविंदराव पानसरे यांना मारून त्यांचे विचार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांची हत्या झाल्यानंतर भाजप सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. गोविंद पानसरे यांना मारल्यावर मारेकऱ्यांना असे वाटले होते की, त्यांचे विचार मारले जातील. आजच्या मोर्चातील गर्दीवरून दिसते की पानसरे जिवंत आहेत, तसेच त्यांचे विचारही जिवंत आहेत. प्रत्येक गोष्टीत मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. 
- उमा पानसरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com