पत्रकारांच्या प्रश्‍नांपासून समाज अनभिज्ञ - एस. एम. देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

सांगली - समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्‍न असू शकतात, याची समाजाला गंधवार्ताच नाही. पत्रकारांना प्रश्‍न असतात हे अनेकांना पटत नाही. पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनच्या लढ्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केले. 

सांगली - समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्‍न असू शकतात, याची समाजाला गंधवार्ताच नाही. पत्रकारांना प्रश्‍न असतात हे अनेकांना पटत नाही. पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनच्या लढ्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी केले. 

मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये जिल्ह्यातील पत्रकार निर्धार मेळावा झाला. त्या वेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी आणि पत्रकार संघटनांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘राज्यात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. त्यामागे ठोस कारण नसते. किरकोळ कारणातूनही पत्रकारांवर हल्ले होत आहेत. गेल्या काही वर्षांतील हल्ले पाहिले तर ७२ टक्के हल्ले राजकीय पक्षांकडून झाले. १५ टक्के हल्ले पोलिस आणि इतर स्थानिक गुंडांकडून झाले आहेत. पत्रकारांवर सर्वाधिक हल्ले राजकीय मंडळींकडून झालेत. त्यामुळे कायदा केला तर अडचणी येतील म्हणून टाळाटाळ केली जात आहे. मागील सरकारने दहा वर्षे तर सध्याच्या सरकारने दोन वर्षे हा प्रश्‍न सोडवला नाही.’’

ते म्हणाले, ‘‘दहा वर्षात ८५० पत्रकारांवर हल्ले झाले. तर गेल्या आठ महिन्यांतच ६४ पत्रकारांवर हल्ले झाले. हल्ले झाले तरी पत्रकारांचे काम थांबलेले नाही. आता तर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे. त्यासाठी सर्व पत्रकार एकत्र आल्याचा मेसेज हल्लेखोर, सत्ताधारी आणि राजकीय मंडळींपर्यंत गेला पाहिजे. कायद्याबरोबर ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याचा प्रश्‍न २० वर्षे प्रलंबित आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नांची समाजाला गंधवार्ताही नाही. त्यामुळे संघटित होऊन लढा द्या. निर्णय घेईपर्यंत आम्ही थांबणार नाही.’’
श्री. देशमुख यांना सहयोगी संपादक श्री. जोशी आणि मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित केले. ज्येष्ठ पत्रकारांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शाहीर देवानंद माळी आणि बाल शाहिरांनी प्रारंभी पोवाडा सादर केला.

Web Title: Unaware of journalistic questions from people