बिबट्याच्या डरकाळीने थरकाप

चोरमारवाडी - बिबट्या शिरलेल्या घरासमोर झालेली ग्रामस्‍थांची गर्दी.
चोरमारवाडी - बिबट्या शिरलेल्या घरासमोर झालेली ग्रामस्‍थांची गर्दी.

उंडाळे - घराच्या अंगणात नेहमीचं धुणं-भांडी सुरू होते... लोकं बोलत बसली होती... अन्‌ अचानक मोठी सावली त्यांना दिसली. मागील पट्टा नावाच्या डोंगरातून गवताच्या आडोशाने घरात काहीतरी शिरल्याचे धुणं धुणाऱ्या महिलेच्या लक्षात आले... तेवढ्यात आतील आजी वाघ वाघ म्हणून जोरात ओरडल्या. अन्‌ भांडी घासणाऱ्या महिलांची शंका खरी ठरली. येथून जवळच असलेल्या चोरमारवाडीतील घटना. त्यामुळे आख्ख्या चोरमारवाडीने रात्रच जागून काढली. तीही घरात शिरलेल्या बिबट्याच्या अनामिक दहशतीखालीच. हातात काठ्या घेवून त्यांनी बिबट्या शिरलेल्या घराला वेढा दिला होता. त्याच स्थितीत त्यांनी पहाट अनुभवली. 

उंडाळे ते येणपे रस्त्यावर येळगाव फाट्यापासून पश्‍चिमेस अवघा १०० उंबरा असलेली चोरमारवाडी काल रात्रीपासून अनामिक दहशतीखाली होती. ती रात्र आख्ख्या गावाने जागून काढली. डोंगराला लागूच पश्‍चिमेला असलेल्या वस्तीत काल रात्री घटना घडली. बाबासाहेब चोरमारे यांच्या घरात शिरलेल्या बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यांची पत्नी मालन जनावरांना चारा घालत होत्या. सून वनिता भांडी घासत होत्या, तर आजी हौसाबाई घरात बसल्या होत्या. त्यावेळी सगळ्यांच्या नजरा चुकवून बिबट्या चक्क घरात शिरला. त्यामुळे हाहाकार माजला. बघता बघता गावात सगळीकडे ही बातमी पसरली. साडेनऊ वाजल्यापासून गावाने आख्खी रात्र जागून काढली. त्यातून काही लोकांनी धाडस करून ज्या घरात बिबट्या शिरला होता, त्या घराचा दरवाजा बंद केला. त्याचा धक्का लागून जखमी झालेल्या आजी हौसाबाई यांना बाहेर काढून प्रथमोपचार केले. त्याचवेळी तेथे जमलेल्यांनी दाराला कडी घालून पोलिस व वन विभागाला कळवले. रात्री साडेदहा वाजता वन विभाग तेथे आला. त्याआधी पोलिस पोचले होते. 

अंधार असल्यामुळे उजाडण्याची वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय त्यांच्या हातात नव्हता. पहाटेनंतर हालचाली होणार असल्याने 
आख्खा गावच त्या बिबट्याच्या दहशतीखाली जागा राहिला. सूर्य बिबट्याला पकडायचेच म्हणून आज चोरमारवाडीवर उगवला होता. वागर आणली होती, ग्रामस्थांनी त्या भागातील वस्ती खाली केली होती. काही लोकांनी शेजारील गावातील लोकांना बोलावले होते. रात्रभर शे-दीडशेपेक्षा जास्त लोकांनी त्या भागालाच गराडा घातला होता. त्यात बिबट्याची डरकाळी कानावर पडली की, त्यांचा थरकाप उडालेला दिसायचा. त्यामुळे ती रात्र काळरात्री होती. चोरमारवाडीसाठी कधीही न विसरणारी ठरत होती. या सर्व घाईत आख्खा गाव मात्र एकवटला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com