चारही सभापतींची निवड बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सांगली - झेडपीच्या विषय समिती सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाचीच पुन्हा सरशी झाली. सत्ताधारी भाजप आघाडीने विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत विकासासाठीच्या मुद्यांवर समन्वयाने कामाचा प्रस्ताव दिला. तो आघाडीने मान्य केला. सभापतिपदासाठी दाखल केलेले अर्ज आघाडीने माघारी घेतले. त्यामुळे चारही सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. 

सांगली - झेडपीच्या विषय समिती सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाचीच पुन्हा सरशी झाली. सत्ताधारी भाजप आघाडीने विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत विकासासाठीच्या मुद्यांवर समन्वयाने कामाचा प्रस्ताव दिला. तो आघाडीने मान्य केला. सभापतिपदासाठी दाखल केलेले अर्ज आघाडीने माघारी घेतले. त्यामुळे चारही सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. 

समाजकल्याण सभापतिपदी ब्रह्मदेव पडळकर (आटपाडी), महिला व बालकल्याण सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे रयत विकास आघाडीतील प्रा. सुषमा नायकवडी (वाळवा) यांची वर्णी लागली. तम्मनगौडा रवी (जत) आणि अरुण राजमाने (मिरज) यांच्या सभापतिपदी निवडी झाल्या. भाजपाला तीन, विकास आघाडीला एक सभापतिपद मिळाले. स्वाभिमानी विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पहिल्या टप्प्यात पत्ता कट झाला. सभापतीच्या समर्थकांनी झेडपीच्या आवारास गुलाल उधळून आणि फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. विषय समित्यांचे वाटप २० एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

वसंतदादा पाटील सभागृहात विषय समिती सभापतिपदाच्या निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी, किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली. सभापती निवडीवरून भाजप व आघाडीत रस्सीखेच सुरू होती. जत, मिरज आणि आटपाडी तालुक्‍याने सभापती पदांवर दावा सांगितला होता. सभापतिपदाच्या नावांवर बुधवारी रात्री उशिरा शिक्कामोर्तब झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदी निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या सदस्यांची बैठक झाली. सत्ताधारी भाजप आघाडीकडील ३५ सदस्यांची बैठक सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ‘वसंत’ बंगल्यावर झाली. त्यात सभापतिपदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या २६ सदस्यांची बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादी कार्यालयात
सभापती निवडीसाठी पुरेसे संख्याबळ नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर दोघे मिळून थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले. जिल्ह्याच्या विकासासाठी एकमेकांच्या हातात हात घालून कामांची विनंती केली. सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर प्रश्न सुटतील. यासाठी अर्ज मागे घेण्याची विनंती अध्यक्ष देशमुख यांनी केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, शरद लाड यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अर्ज मागे घेतले. 

सभापती निवडीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर, राहुल महाडिक, गौरव नायकवडी आदी उपस्थित होते.

शेट्टी, घोरपडेंचा पत्ता कट 
आठ दिवसांपासून स्वाभिमानी विकास आघाडी, शेतकरी संघटनेने सभापतीसाठी फिल्डिंग लावली होती, मात्र आघाडी व संघटनेचा पत्ता निवडीत कट करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सभापतिपदाची मागणी केली. मात्र बुधवारी मुंबईत भाजप मित्र पक्षांच्या बैठकीत मित्र पक्षांची समजूत काढण्यात भाजपला यश आले. दोघांना पुढील वेळी संधी दिली जाणार आहे.

आठ अर्ज
विषय समित्यांसाठी चार, तर महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापती पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. विषय समित्यांसाठी भाजपाचे तम्मनगौडा रवी, अरुण राजमाने, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे सतीश पवार यांनी अर्ज दाखल केले. महिला व बालल्याण सभापती पदासाठी रयत विकास आघाडीच्या प्रा. सुषमा नायकवडी आणि काँग्रेसच्या कलावती गौरगौड, समाजकल्याण सभापती पदासाठी भाजपचे ब्रह्मदेव पडळकर आणि राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे यांचे अर्ज दाखल झाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सत्ताधारी भाजपला विकासाच्या मुद्यावर सभापती निवडीसाठी बिनविरोधसाठी पुढे चाल दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व चारही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे तीन, रयत विकास आघाडीचे एक सभापतिपद बिनविरोध निवडल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. 

आमदार समर्थकांना संधी
सभापतीसाठी आमदार विलासराव जगताप गटाचे तम्मनगौडा रवी, खासदार संजय पाटील आणि आमदार सुरेश खाडे गटाचे अरुण राजमाने यांना संधी देण्यात आली. भाजप नेते गोपीचंद पडळकर गटाने सभापतीसाठी दावा केला होता. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाला पंचायत समितीचे सभापतिपद मिळाल्याने झेडपी सभापतिपदी ब्रह्मदेव पडळकर यांची वर्णी अपेक्षित होती. रयत विकासच्या नेत्यांकडून प्रा. नायकवडी यांच्या नावावर यापूर्वीच शिक्कामोर्तब झाले होते. त्याप्रमाणे महिला बालकल्याण समिती सभापतिपदी त्यांना संधी मिळाली.

नेहमीच दुर्लक्षित म्हणून महिला व बालकल्याणकडे पाहिले जाते. कामांच्या माध्यमातून विभागाचा चेहरा निर्माण केला जाईल. सभापती निवडीसाठी रयत आघाडीचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी यांच्यासह भाजप नेत्यांनी विश्वास टाकत संधी दिली.
- सुषमा नायकवडी,सभापती, महिला व बालकल्याण

जिल्ह्याच्या विकासासाठी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने समन्वयाने कामाचा निर्णय घेतला. २० एप्रिलला होणाऱ्या समित्यांच्या सदस्य निवडीही बिनविरोधचा प्रयत्न आहे. आमच्या कारकिर्दीत नवीन प्रथा निर्माण केली आहे. काम करताना अडचण येणार नाही.
- संग्रामसिंह देशमुख,  अध्यक्ष, जि. प., सांगली

समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवू. विरोधकांना सोबत घेऊन काम केले जाईल. मागासवर्गीय समाजाचे अनेक प्रलंबित आहेत. ते प्रामाणिकपणे सोडवले जातील. समाजकल्याणसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी आणू. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यामुळे संधी मिळाली.
- ब्रह्मदेव पडळकर, सभापती, समाजकल्याण.

Web Title: unopposed selection in zp