देणी ४५० कोटी; घोटाळा २२८ कोटींचा

विष्णू मोहिते 
सोमवार, 3 एप्रिल 2017

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावरील ९३ कोटी कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने कारखान्याचा ताबा घेतला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा अशी बिरुदावली असलेल्या कारखान्यावर आर्थिक अरिष्ट कोसळलंय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हा कारखाना मोडीत न काढता तो कोणत्याही परिस्थितीत  सुरू राहावा, अशी बैठकीत भूमिका घेतली. मात्र तो  कसा याबाबत काहीच ठोस पर्यायांवर चर्चा झाली नाही. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा  पाटील यांनी स्थापन केलेल्या कारखान्याचा ऱ्हास सभासदांना पचवावा लागतोय....

सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर नेमके कर्ज किती याचा उलगडा कारखान्याच्या अहवालात सापडत नाही. कारभाऱ्यांनी अहवालात गतवर्षी दाखवलेली देणी १८० कोटी आणि जिल्हा बॅंकेचे ९३ कोटी मिळून पावणेतीनशे कोटींच्या घरात आकडा जातो. शेतकरी, कामगार आणि अन्य बॅंकांची देणी त्यात दाखवली नाहीत. ती सव्वाशे कोटींच्या घरात म्हटली तर आजमितीस ४४४ कोटींची टोपी ३६ हजार शेतकरी सभासदांवर आहे. ‘वसंतदादा’च्या लेखा परीक्षणात २२७.६३ कोटी रुपये घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम संबंधितांकडून वसुलीनंतरच भाडेपट्टा किंवा विक्रीला हरकत नाही.

सहकारी कारखानदारीत वसंतदादा कारखान्याचे स्थान काय, हे सांगण्याचीही गरज नाही. महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीला कळसावर नेणाऱ्या वसंतदादांचे नेतृत्व कारखान्याला लाभले. सहकाराच्या व्यवस्थापनाचा धडा देणारे गुलाबराव पाटील, सहकारमहर्षी आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, विष्णुअण्णा पाटील अशा अनेक दिग्गजांनी या कारखान्याचे कारभारपण केले. त्या कारखान्यावर कर्जवसुलीसाठी भाडेपट्टा नव्हे तर विक्रीचीच वेळ आली आहे. वसंतदादांच्या पश्‍चात विष्णुअण्णा वगळता कारखान्याची धुरा प्रकाशबापू आणि त्यांच्या पश्‍चात त्यांच्या थेट वारसांकडे आजतागायत कायम आहे. तरीही सर्वांसमक्ष कारखान्याची अधोगती झाली हे सत्य आहे. याला गैरव्यवस्थापन हे प्रमुख  कारण आहे. सुमारे साडेचारशे कोटींची फेड करण्याची हिंमत नसलेल्यांकडे कारखान्याचे नेतृत्व आहे. 

२२८ कोटी घोटाळ्याची कलम ८८ नुसार चौकशी

वसंतदादा कारखान्याच्या लेखा परीक्षणात २२७.६३ कोटी घोटाळा झाला आहे. या प्रकरणी कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश कोल्हापूर प्रादेशिकचे सहसंचालक सचिन रावल यांनी दिले आहेत. लेखा परीक्षणात संचालकांची मनमानी, नियमबाह्य कारभारामुळे २० प्रकरणात हा घोटाळा झाला. ८८ ची चौकशी विशेष लेखा परीक्षक आर. बी. वाघ आठ महिन्यांत करणार आहेत. चौकशीसाठी ४० हजार रुपये भरण्यास सांगितले आहे. 

प्रशासकांच्या शक्‍यतेने घाई...
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर कोणत्याही क्षणी प्रशासक नेमला जाईल, याची भीती संचालकांना होती. राज्य शासनाने प्रशासक नेमून गैरकारभाराची चौकशी केली तर आजवरचे अध्यक्ष-उपाध्यक्ष व संचालकांवर जबाबदारी निश्‍चितीचा धोका कायम होता. तो टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कारखाना भाडेपट्ट्याने व विक्रीसाठी प्रयत्न करण्यात आला. 

जिल्हा बॅंक ताबा योग्य की अयोग्य
‘वसंतदादा’वरील ९३ कोटी कर्जवसुलीसाठीचा ताबा योग्य की अयोग्य याबाबत सभासद, संघटना, शेतकरी व कामगार यांच्यातला अंतर्गत मामला असेल. मात्र ९३ कोटींसाठी ६०० कोटींचा कारखाना ताब्यात घेण्याची कार्यवाही घाईगडबडीत झाली. त्यासाठी पुरेसा कालावधीही देण्यात आला नाही. कारखाना भाडेपट्ट्याने किंवा ताबा घेण्यासाठी राज्य शासन किंवा डीआरटीकडून परवाना घेण्यात आला नाही. 

‘प्रकाशबापूंना’ ईर्षा नडली
गुजरातमधील कारखाना खरेदीसाठी प्रकाशबापू आणि जयंत पाटील लिलावात उतरले. ईर्षा, खुमखुमीने बोली चढत गेली, प्रकाशबापू जयंत पाटलांना म्हणाले, ‘कारखाना मी घेणार.’ तो घेतला. तेव्हा सोनी कारखान्याचा बोजा सन १९९५ पासून वसंतदादा कारखान्यावर पडला, तो वाढतच केला.